Join us  

राज पुरोहितांच्या जागी राहुल नार्वेकरांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 3:30 AM

कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट केला.

मुंबई: कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे नार्वेकर कालपर्यंत भाजपचे सदस्यसुद्धा नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना आॅनलाइन भाजपचे सदस्यत्व बहाल झाले आणि त्यांनी कुलाब्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.कुलाबा येथून राज पुरोहित यांचा पत्ता कापला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. विविध कारणांनी त्याबाबतचा निर्णय लांबणीवर पडत होता. गुरुवारी उशिरा राहुल नार्वेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पुरोहित यांच्याबाबतच्या तक्रारी, सत्तेची सूत्रे कुटुंबातच राहतील यासाठीचा त्यांचा आटापिटा, अशा विविध कारणांसोबत पक्ष नेतृत्वाबाबतची अघळपघळ विधाने पुरोहितांना भोवल्याची चर्चा आहे. कुलाब्यात भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप असा सामना रंगणार आहे. राज यांच्या जागी ऐनवेळी नार्वेकरांना उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही काहीसा नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुंबई