Join us  

उंदीर विरोधकांच्या डोक्यात; खडसे शेजारी असतानाच मुनगंटीवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 3:49 PM

उंदीर मंत्रालयात नसून यांच्या डोक्यात आहे

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उंदीर मंत्रालयात नाही, तर यांच्या डोक्यात असल्याचा टोला काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर विधान सभेमध्ये मंत्रालयातील उंदीर घोटाळा काढून स्वपक्षीयांना अडचणीत आणणारे भाजप नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. भाजपाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. 

या मेळाव्यात बोलताना मुनगंटीवार यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीवरही टीका केली.  उंदीर मंत्रालयात नसून यांच्या डोक्यात आहे असे म्हणाले. खडसे यांनीच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप करीत भाजपले अडचणीत आणले होते आणि खडसे हे मुनगंटीवार यांच्याच बाजूला बसले होते.  त्यामुळं नेमका हा टोला कोणाला होता. खडसे की विरोधकांना. याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. 

काँग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इच्छा आहे. काँग्रेस म्हणजे कौरव सेना असून, कौरव सेना एकत्र येत आहे अशी टीका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे.  काही लोकांचे हे घराणेशाहीचे राजकारण आहे. काही जण स्क्वेअर मीटरवर राजकारण करतात, असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील मेळाव्याचा देखील आशिष शेलार यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.

चहावाल्याच्या नादी लागू नका - मुख्यमंत्री  

चहावाल्याच्या नादी लागू नका. नाहीतर पुन्हा एकदा धूळधाण होईल, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. मंत्रालयातील चहापानावर झालेल्या खर्चावरुन शरद पवारांनी भाजपवर टीका केली होती. शरद पवार यांच्या या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उत्तर दिले.  'आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच देतो,' अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी पवारांना थेट इशाराही दिला. 'पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 मध्ये उडालेली धूळधाण लक्षात ठेवा,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आधी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

'शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात'

राहुल बाबा मोदींना साडे चार वर्षांचा हिशोब मागतात, जनता तुम्हाला चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे. शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही, तसा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही.  

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारएकनाथ खडसे