Join us

भाजपा हरली... मुख्यमंत्री जिंकले

By admin | Updated: November 3, 2015 01:14 IST

कल्याण - डोंबिवली महापालिकेवर स्वबळावर भगवा फडकाविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला निकालाच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये मोठा धक्का बसला. ६३ जागांवर आघाडीवर

- नारायण जाधव,  ठाणेकल्याण - डोंबिवली महापालिकेवर स्वबळावर भगवा फडकाविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला निकालाच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये मोठा धक्का बसला. ६३ जागांवर आघाडीवर असलेल्या शिवसेनेला अंतिम निकालात ५२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले ६५०० कोटींचे पॅकेज, डोंबिवलीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने ३८ पैकी २० जागांवर दिलेली साथ आणि स्वतंत्र नगर पालिकेसाठी ‘त्या’ २७ गावातील ग्रामस्थांनी १७ पैकी १४ ठिकाणी संघर्ष समितीच्या नावाखाली दिलेला कौल यामुळे भाजपाला ४२ जागांवर मोठे यश मिळाले आहे.या निवडणुकीत पाच सभा घेऊन मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठापणाला लावली होती. तर उद्धव ठाकरेंनी चार सभांद्वारे शिवसैनिकांना चेतवले होते. या लढाईत गेल्या खेपेला अवघ्या ९ जागा असलेल्या भाजपाने ४२ जागा पटकावून उल्लेखनीय यश मिळविले आहे. तर ३४ जागा असलेल्या शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच भाजपाची संख्या ३३ ने वाढली असून शिवसेनेची सदस्य संख्या १६ ने वाढली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंची मोर्चेबांधणी आणि उद्धव ठाकरेंच्या सभांचा झंझावात यामुळे सर्व काही विरोधात असतानाही शिवेसेनेला ५२ जागा मिळाल्या आहेत. आता १० जागांची तडजोड करून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकाविण्याची तयारी चालविली आहे.या लढाईत राज ठाकरेंच्या मनसेची सदस्य संख्या २७ वरून ९ वर आली असली तरी सत्तासोपानातील महापौरपद कोणाचा हे ठरविण्यासाठी तेच खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरणार आहेत. प्रचाराच्या शुभारंभापासूनच आरोप - प्रत्यारोपांसह ‘पंजे’, जबडे काढण्यात आणि शेवटच्या रात्रीत गोळीबारासह तलवारी नाचवण्यापर्यंत प्रचाराची मजल गेली होती. खऱ्या अर्थाने ही निवडणूक केवळ भाजप-शिवसेना यांच्यातच लढली गेली. निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्ध गाजले. वाघाचा पंजा, वाघाच्या तोंडातील दात, सरकार तडीपार करण्याचे इशारे अशा अनेक वादग्रस्त विधानांमुळे प्रचार तापला होता. राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांचा हवाला देऊन मतदारांना साकडे घातले होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ही निवडणूक मनापासून लढविलीच नाही. यामुळे त्यांचा आघाडी करूनही दारूण पराभव झाला. यात काँगे्रसला अवघ्या चार तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच गेल्या खेपेपेक्षा काँगे्रसचे संख्याबळ ११ तर राष्ट्रवादीचे १२ ने कमी झाले आहे.इकडे शत-प्रतिशत भाजपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीपासूनच फिल्डींग लावली होती. पक्षाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, कल्याणचे नरेंद्र पवार, शिक्षक आमदार रामनाथ मोते, खासदार भिवंडीचे खासदार कपील पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरेंना सोबत घेतले. रणनिती म्हणून कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड आणि ग्रामीण भागातील मनसेचे माजी आमदार रमेश पाटील यांच्यासह त्या २७ गावांतील ग्रामस्थांना स्वतंत्र नगरपालिकेचे गाजर दाखवून शिवसेनेला मोठे आव्हान दिले होते. पक्षाने डोंबिवलीत संघ स्वंयसेवकांना डावलून गुंड-पुंडाना तिकीट दिले म्हणून सुरूवातीच्या काळात निवडणूक प्रचारात ‘दक्ष ’ नसलेल्या स्वंयसेवकांची मनधरणी करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी दोनदा खास बैठक घेऊन समजूत काढली. शेवटच्या दोन दिवसात संघ कोअर कमिटीतील प्रमुख नेते विनय सहस्त्रबुद्धे यांना डोंबिवलीत पाठवून संघ नेत्यांची उरलीसुरली नाराजी दूर केली. त्याचा व्हायचा परिणाम आता निवडणूक निकालात दिसून आला आहे. गेल्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाणाऱ्या संघाने यावेळी मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेऊन डोंबिवलीत ३८ पैकी २० जागा भाजपला दिल्या आहेत. यामुळे मनसे २७ वरून ९ जागांवर आला आहे. त्यांच्या १८ जागा कमी झाल्या आहेत. शिवाय त्या २७ गावांतील ग्रामस्थांना तुम्ही स्वतंत्र नगरपालिकेसाठी भाजपाला कौल द्या, हे अमिष चांगलेच पथ्थ्यावर पडले असून संघर्ष समितीला १४ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच ३४ जागा भाजपाला संघ आणि संघर्ष समितीच्या बळावर मिळाल्या असून तेथेच शिवसेना हातून सत्ता स्थापनेच्या मॅजिक फिगरपासून १० जागांनी मागे राहीली. शिवाय मुख्यमंत्र्याचे शतप्रतिशत भाजपा हे स्वप्न ही भंग पावले. एकंदरीत या लढतीचे वर्णन ‘मुख्यमंत्री जिंकले भाजपा हरली’, असेच करावे लागेल. आता २७ गावांवरून कसोटीज्या २७ गावांनी १४ जागांवर कौल देऊन भाजपाची इभ्रत राखली, त्या गावांत मुख्यमंत्री आता खरोखर स्वतंत्र नगरपालिका जाहीर करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी दिल्या शब्दाला जागून जर या गावांची नगरपालिका जाहीर केली. तर भाजपाच्या १४ जागा एकदम कमी होऊन संख्याबळ २९ वर जाणार आहे. तर नगरपालिका नाही केली तर संघर्ष समितीसह तेथील ग्रामस्थांचा विश्वासघात करण्यासारखे होणार आहे. यामुळे आता या विषयावर मुख्यमंत्र्याची मोठी कसोटी लागणार आहे.एमआयमएमचे यश अनपेक्षितकेडीएमसी निवडणुकीत ७ जागा लढणाऱ्या अकबरूद्दीन ओवेसींच्या एमआयएम दोन जागा मिळाल्या आहेत. यात एक जागा पुरस्कृत आहे. नांदेड, औरंगाबाद, महापालिकेपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिकेत या पक्षाने शिरकाव केला आहे. कट्टरवादी विचारसरणी असलेल्या या पक्षाचा शिरकाव साऱ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. अंतिम टप्प्यात शिवसेना-भाजपासह संघ नेत्यांची वादग्रस्त विधानांनी एमआयएमचा कल्याणातील शिरकाव सोपा केला आहे.