सुशांत मोरे, मुंबईमुंबई : मोदी लाट लोकसभेत दिसून आल्यानंतर ही लाट विधानसभेत कायम राहील की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच त्याचे उत्तर भाजपाकडून देण्यात आले. ज्या भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे अशा भागात भाजपाच्या उमेदवारांनी चांगलीच मुसंडी मारली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह, शिवसेनेच्या उमेदवारांनाही पराभवाचा झटका दिला. सायन कोळीवाड्यात अशीच काहीशी परिस्थिती दिसून आली. काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मागे टाकत भाजपाचे तामिल सेल्वन यांनी विजय मिळवला आणि मोदी लाट असल्याचे दाखवून दिले. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड, भाजपाचे तामिल सेल्वन, शिवसेनेचे मंगेश सातमकर, मनसेचे बाबा कदम आणि आरपीआय आठवले गटाचे असलेले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले मनोज संसारे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघातून काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेट्टी हे हॅट्ट्रिक साधतील असे वाटत होते. त्यासाठी शेट्टी यांनी प्रतीक्षा नगर, अॅण्टॉप हिल या दक्षिण भारतीयांची सर्वाधिक संख्या असलेल्या भागात चांगलीच फिल्डिंग लावली होती. त्याचप्रमाणे भाजपाचे नगरसेवेक राहिलेले तामिल सेल्वन यांनीदेखील या भागावर चांगलेच लक्ष केंद्रित केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे २00९ सालच्या विधानसभा निवडणुकीत चार आमदारांनी चांगलीच मते घेतली होती. यात जगन्नाथ शेट्टी यांनी ४५ हजार ६३८ मते घेऊन पहिला क्रमांक पटकावला होता. तर भाजपाच्या मनीषा कायंदे २७ हजार ६१५ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यानंतर मनसेचे विनोद खोपकर हे २0 हजार ८२७ मते घेऊन तिसऱ्या तर तेव्हा आरपीआय आठवले गटाचे मनोज संसारे यांनी १५ हजार ६६१ मते घेऊन चौथा क्रमांक पटकावला होता. शेट्टी यांना मिळालेली मते पाहता ते हॅट्ट्रिक साधतील असे वाटत असतानाच तामिल सेल्वन यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. शेट्टी यांच्याबद्दल सायन कोळीवाड्यात असलेली नाराजी आणि मोदी लाट याचा फायदा सेल्वन यांना मिळाल्याचे पुरेपूर दिसून आले. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्षात भाजपा आणि शिवसेना यांच्यातच खरी लढाई झाली. शिवसेनेचे मंगेश सातमकर यांचा अटीतटीच्या लढतीत सेल्वन यांनी पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासूनच सेनेचे सातमकर यांनी आघाडी घेतली होती. आठव्या फेरीपर्यंत फक्त १९३ मतांची आघाडी घेतल्यानंतर नवव्या फेरीपासून भाजपाचे सेल्वन यांनी आघाडी घेतली ती थेट शेवटच्या फेरीपर्यंत. सेल्वन यांना ४0,८६६ मते मिळाली आणि त्यांनी सातमकर यांचा ३,७३८ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे दोन वेळा निवडून आलेले आमदार जगन्नाथ शेट्टी यांना फक्त २३,१0७ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड यांना अवघी ११,७६७ मते मिळाली. विजय नगर, अॅण्टॉप हिल आणि जैन सोसायटी येथून भाजपाच्या सेल्वन यांना सर्वाधिक मते मिळाल्यानेच त्यांचा विजय झाल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेस, सेनेच्या भागात भाजपाची मुसंडी
By admin | Updated: October 23, 2014 02:25 IST