Join us  

भाजप, सेना कार्यकर्त्यांचा काश्मीरप्रश्नी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:20 AM

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

मुंबई : कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाची बातमी झळकू लागताच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झाली. मुंबई भाजपचे दादर कार्यालय, नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मार्बल आर्च कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त करताना एकमेकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या.भाजप, विशेषत: भाजपाध्यक्ष अमित शहा सातत्याने शिवसेनेच्या निशाण्यावर असतात. सोमवारी शहा यांनी गृहमंत्री म्हणून जम्मू-कश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडताच शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली. दादर भागातील शिवसैनिक शिवसेना भवनात दाखल झाले. या वेळी ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये तिरंगा आणि भगवा झेंडा फडकावण्यात आला. तसेच पेढे, लाडू, मिठाई वाटून शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशी घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत शिवसैनिकांनी येणाऱ्याजाणाऱ्यांना लाडू वाटले.भाजप प्रदेश कार्यालयात श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रदेश कार्यालयातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :जम्मू-काश्मीरकलम 35-एकलम 370भाजपाशिवसेनाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ