Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिवरांच्या संरक्षणासाठी बायोफेनसिंगचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 02:00 IST

वर्सोवा, लोखंडवाला परिसरात तिवरांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, पूर्वी या झाडांना संरक्षण नसल्याने, भूमाफिया या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून येथे अनधिकृत बांधकामे व झोपड्या उभ्या राहत असत.

मुंबई : पर्यावरणाच्या रक्षणात व मत्स्यबीज निर्मितीत तिवरांच्या झाडांचे खूप महत्त्व आहे. येथील तिवरांच्या झाडांच्या संरक्षणासाठी बायोफेनसिंग कवच उभारण्यात आले आहे. वर्सोवा बँक रोडला १८० मीटर बायोफेनसिंग कार्यान्वित झाले असून, येथील ७ ठिकाणी सुमारे ३९३२.४८ चेनफेनसिंग करण्यात येत आहे. अशा प्रकारची मुंबईतील ही पहिलीच अभिनव योजना असून, येथील तिवरांच्या झाडांना संरक्षण कवच मिळाले आहे, असे वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार भारती लव्हेकर यांनी सांगितले. ५ जून रोजी सकाळी ९ वाजता बायोफेन्सिंग योजनेचा शुभारंभ बीच क्लीनिंगचे जनक अफरोझ शाह करणार आहेत.

वर्सोवा, लोखंडवाला परिसरात तिवरांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, पूर्वी या झाडांना संरक्षण नसल्याने, भूमाफिया या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून येथे अनधिकृत बांधकामे व झोपड्या उभ्या राहत असत. परिणामी, यावर उपाय योजनेकरिता लव्हेकर यांनी काम सुरू केले. बायोफेनसिंग म्हणजे जैविक कुंपण, ज्याला व्हर्टिकल गार्डन अथवा लिव्हिंग वॉल म्हटले जाते, अशी योजना राबविण्याचे त्यांनी ठरविले. तिवरांच्या झाडांच्या संरक्षणासाठी बायोफेनसिंग व चेनफेनसिंगची योजना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडण्यात आली. या कामाला मंजुरीही मिळाली. दरम्यान, शहरीकरणाच्या अमर्याद वेगामुळे फोफावलेल्या काँक्रीटच्या जंगलात हरितक्रांती घडविण्याची मुंबईतील ही पहिली योजना निश्चित एक बेंचमार्क ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.