Join us  

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत; रेल्वे मंत्रालयाकडून आभार व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 8:25 PM

कोरोनाशी सामना करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मास्क बनविणे, सॅनिटायझर तयार करणे सुरु आहे.

कुलदीप घायवट 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मास्क बनविणे, सॅनिटायझर तयार करणे सुरु आहे. यासह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना अन्न पुरवठा, जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केला जात आहे. हि कामे करताना केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत म्हणून आतापर्यंत ७२ कोटी रुपयांची रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी औद्योगीक संस्था, सामाजिक संस्था यांच्याद्वारे कोरोनाशी सामना करण्यासाठी पंतप्रधान यांना मदत निधी देत आहे. त्याचप्रमाणे ऑल इंडिया एसी, एसटी एम्प्लाइज असोसिएशन, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक साहाय्य म्हणून ७१ कोटी ७७ लाखांची रक्कम देण्यात आली आहे. आर्थिक साहाय्य केल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.  

ऑल इंडिया एसी, एसटी एम्प्लाइज असोसिएशनच्या सर्वाधिक रक्कम देण्यात आली आहे.  असोशियनच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत निधी म्हणून ७० कोटी रुपये दिले आहेत.  ऑल इंडिया एसी, एसटी एम्प्लाइज असोसिएशनच्या 3.50 लाख कर्मचाऱ्यांचा मासिक वेतनातील एका दिवसाचा पगार मदत म्हणून पंतप्रधानांना दिला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बी एल बैरवा यांनी दिली. 

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून केंद्र आणि राज्य सरकारला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात व  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारला ५० लाख तर केंद्र सरकारला ५० लाख रुपये असे एक कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील एक दिवसाचा पगार मदत निधीसाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी दिली.

---------------------------------------------------

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनकडून केंद्र आणि राज्य सरकारला एकूण ७७ लाखांची मदत करण्याचे घोषित केले आहे. सर्व यंत्रणा कोरोनाला हरविण्यासाठी मागे लागले आहेत. प्रत्येकाकडून आर्थिक साहाय्य दिले जात आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी आर्थिक निधी साहाय्य म्हणून 'पीएम केअर फंड' मध्ये ५२ लाख रुपये आणि 'महाराष्ट्र सीएम वेल्फेअर फंड'  यामध्ये २५ लाख रुपये मदत म्हणून दिली आहे, अशी माहिती वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस जे. आर. भोसले यांनी दिली. 

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्या