नामदेव मोरे, नवी मुंबईऔद्योगिक वसाहतीमधील झोपडपट्टीधारकांना मीटर बंद असूनही मनमानी पद्धतीने वीजबिल पाठविले जात आहे. विजेचा वापर नसतानाही महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा जास्त बिल दिले जात आहे. प्रथम सर्व बिल भरा, नंतर दुरुस्तीचे पाहू, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने महावितरणकडून गरिबांची पिळवणूक सुरू आहे.झोपडपट्टीमधील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कल्पना गव्हाळे यांचे नेरूळ एमआयडीसीतील बोनसरीमध्ये घर आहे. बचत गटाच्या कामाचा व्याप वाढल्यामुळे चार वर्षांपासून त्या वाशीमध्ये राहण्यास गेल्या आहेत. तेव्हापासून येथील घर बंदच असते. १५ दिवसांतून किंवा महिन्यामधून एखाद्यावेळी बचत गटाच्या मीटिंगसाठी त्या या परिसरात येत असतात. घरातील विजेचा वापर नसला तरी महिन्याला येणारे बिल त्या नियमित भरत होत्या. परंतु तीन ते चार महिन्यांपासून घरातील वीजपुरवठा बंद झाला आहे. वीजबंद असली तरी महावितरण कर्मचारी पहिल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त किमतीचे बिल पाठवत आहेत. वीजबिलामध्ये चुका असून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. इंदिरानगरमधील कार्यालयात गेले असता त्यांनी प्रथम वाशीमध्ये जाण्यास सांगितले. वाशी कार्यालयाने पुन्हा इंदिरानगरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पुन्हा संबंधित कार्यालयामध्ये गेल्यानंतर अगोदर दिलेले बिल भरा, नंतर दुरुस्तीचे पाहून असे सांगण्यात आले. विजेचा वापर न करता एवढे बिल पाठविणे योग्य नसल्याविषयी सांगितल्यानंतर तुम्ही हवे तर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याविरोधात तक्रार करा, अशी उत्तरे दिली व अखेर मीटर काढून नेले.
मीटर बंद असूनही पाठविले बिल
By admin | Updated: December 2, 2014 00:22 IST