वाडा: पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत आहे. आता तर, विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्याचे बांधकाम न करताच आठ लाखाचे बिल मंजूर केल्याचा प्रताप केला आहे. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज ठाकरे यांनी मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.अबिटघर ग्रामपंचायत हद्दितील साठेपाडा या आदिवासी पाड्याकडे जाणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आले नाही. मात्र बिल काढल्याची माहिती त्यांना मिळाली. यासंदर्भात वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. परंतु प्रथम अधिकाऱ्यांनी देण्याचे टाळले. सहा महिन्याच्या पाठपुराव्यानंतर मिळालेल्या माहितीतून मात्र सत्य बाहेर आले आहे.अबिटघर -साठेपाडा या रस्त्याला सन २०१३ -१४ च्या अर्थसंकल्पामध्ये जिल्हा नियोजन मंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी उपयोजना अंतर्गत ५०५४ या लेखाशिर्षाखाली खडीकरण व मजबूतीकरणासाठी आठ लाख रुपये मंजुर केले होते. मात्र २०१३-१४ मध्ये या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. त्यानंतर जव्हार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्च २०१४ मध्ये ठेकेदारांच्या संगनमताने या कामाचे पूर्ण देयक अदा केले असल्याचे ठाकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. बिल अदा झाले असले तरी पक्क्या रस्त्याचा पत्ता नसल्याने नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.जी. संख यांच्याशी संपर्क साधला असता रस्ता जिल्हा परिषदेत अंतर्गत आहे. त्यामुळे सार्वजनिक बाध्ांकाम विभागाने त्यावर खर्च करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)
रस्ता न बांधताच काढले बिल
By admin | Updated: May 5, 2015 00:12 IST