खालापूर : तालुक्यात अनेक ठिकाणी दुबार भातपीक घेतले जाते. कालव्यातून आलेल्या पाण्यावर शेती केली जात असून सध्या शेतक-यांची भातशेती लावण्यासाठी लगबग उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खालापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी असली तरी आजही अनेक भागात शेती केली जाते. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने बळीराजा शेतीच्या कामांमध्ये व्यस्त दिसून येत आहे. खालापूर तालुक्यातील काही भागात आजही उन्हाळी भातशेती केली जाते. कलोते, वडगाव, डोणवत या परिसरात उन्हाळी शेती करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कलोते व डोणवत धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर ही शेती करण्यात येते. पावसाळ्यात भातशेती करणाऱ्यांची संख्या अधिक असून उन्हाळ्यात मात्र काही प्रमाणातच भाताचे पीक घेतले जाते. खालापूर हा मोठ्या प्रमाणात कारखानदारी असलेला तालुका असून कारखानदारीने तालुक्याला वेढले असताना अनेकांनी आपली शेती कायम ठेवून भात लावण्याची परंपरा आजही जोपासली आहे. रायगडला एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे, परंतु मोठ्या प्रमाणात आलेल्या कारखानदारीने रायगडची ही ओळख पुरती पुसली गेली. मुंबईच्या जवळ असलेला औद्योगिक जिल्हा म्हणून नवीन ओळख रायगडची झाली आहे. खालापूर तालुक्यातील कलोते, नडोदे, निंबोडे, वणवे, लोहोप, माजगाव, वारद, पौध, वडगाव, वाशिवली, इसांबे, वानिवली, डोणवत, गोरठण, आपटी या भागांत उन्हाळी भातशेती करून भाताचे पीक घेतले जाते. सध्या शेतकऱ्यांची लावणीची लगबग सुरू असून बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र खालापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
बळीराजा उन्हाळी भातशेतीच्या कामात व्यस्त
By admin | Updated: March 9, 2015 22:38 IST