मुंबई : मतविभाजनाचा फटका बसणाऱ्या सायन-कोळीवाड्यात सध्या सर्वच उमेदवारांचे धाबे दणाणलेले आहे. उमेदवारांकडून प्रचार जरी केला जात असला तरी पक्षातील बडे नेतेच प्रचारासाठी येत नसल्याने उमेदवारांमध्येच नाराजी पसरली आहे. तर सोबत असलेले कार्यकर्तेही प्रचारातून काढता पाय घेत आहेत. सायन-कोळीवाड्यातून काँग्रेसकडून जगन्नाथ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसाद लाड, भाजपाकडून सेल्वेन तामिल, शिवसेनेकडून मंगेश सातमकर, मनसेकडून बाबा कदम हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वच उमेदवारांकडून आपला मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. काँग्रेसचे शेट्टी हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले असून यंदाही हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीने त्यांनी मतदासंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. मात्र यंदा राष्ट्रवादीची साथ नसल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी एकट्याच्या जोरावर लाड हे या भागातून निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फौज त्यांनी तयार केली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे सातमकर यांनी आणि भाजपाचे सेल्वेन तामिल आणि मनसेचे कदम यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा ते प्रचारात कमीच पडत असल्याचे दिसते. भाजपाकडून मुंबईत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. तर मनसेकडून राज ठाकरे, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे. मात्र प्रचार फेऱ्यांमध्ये उमेदवारांसोबत एकही बडा नेता सामील झालेला नाही. (प्रतिनिधी)
प्रचारासाठी बडे नेते येईनात
By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST