Join us  

कोळीवाडे व गावठाण सीमांकन विरोधात भूमीपूत्र झाले आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 2:25 PM

Koliwade and Gaothan : मालाड पश्चिम भाटी कोळीवाडा येथे कोळीवाडे व गावठाण सीमांकन संदर्भात सभा संपन्न झाली.

मनोहर कुंभेजकर

मुंबई: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परिसरातील कोळीवाडे व गावठाण सीमांकन विरोधात भूमीपूत्र आक्रमक झाले आहेत. मालाड पश्चिम भाटी कोळीवाडा येथे नुकतीचकोळीवाडे व गावठाण सीमांकन संदर्भात सभा संपन्न झाली. या सभेला कृष्णा कोळी, मढ पातवाडी,लक्ष्‍मण कोळी, धनाजी कोळी,झुरण कोळी -भाटी कोळीवाडाहेमंत कोळी व  दिगंबर वैती,यशवंत केणी मालवणी गाव,जागृती भानजी -वेसावे कोळीवाडा,आल्वीन बेडोअयाड व भीमसेन खोपर-मनोरी,रॉनी किनी व थॉमस झोलार-गोराई,धीरज भंडारी,मनोहर भंडारी दर्शन किनी-- चारकोप,प्रतिभा पाटील, जुहू कोळीवाडा,राजेश केणी, सायन आदी मान्यवर उपस्थित होते.

विस्तारित सीमांकनाविषयी आपण काय दक्षता घ्यावी, यावर सभेत सविस्तर चर्चा झाली. कोळीवाडे व गावठाण यांच्या सीमांकनाविषयी जो अन्याय होत आहे त्याविषयी रूपरेषा ठरविली गेली. प्रत्येक गावाच्या समस्यांची चर्चा न करता संपूर्ण ठाणे, मुंबई, परिसरातील कोळीवाडे व गावठाण यासाठी काय करायचे याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार यांना निवेदने देण्यात आलेली आहेत, त्याविषयी साधारण चर्चा झाली.मुंबई शहराचे पालकमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री श अस्लम शेख यांना सुद्धा निवेदन देण्यात आले .

मुंबईतील गावठाण व कोळीवाडे हे गेल्या शेकडो वर्षापासून अस्तित्वात आहेत मग त्या जुन्या हद्दी व नकाशे कोठे आहेत. आत्ता जे नवीन नकाशे केले आहेत ते आले कुठून ? जुन्या हद्दीचा विचार कां केला गेला नाही ? त्यासाठी विस्तारित सीमांकन व्हायला पाहिजे असा सवाल यावेळी करण्यात आला. तर कोळीवाड्यांच्या शेजारीच कोळीवाड्यांच्या मोकळ्या जागा होत्या, ज्यावर कोळीबांधव मासळी सुकवीत असत किंवा जहाज रिपेअर करणे इत्यादी कामे करीत असत, त्या जागा नवीन डीपी रोड प्लान दाखवताना नवीन विस्तारित क्षेत्राप्रमाणे का दाखवल्या गेल्या नाहीत ? यावर चर्चा झाली.

टाऊन प्लॅनिंग प्रमाणे जर रस्ता नऊ फुटाचा व 18 फूटांचा असेल तर बांधकामासाठीचा एफएसआय हा फार कमी मिळतो व हा बांधकामासाठीचा एफएसआय बिल्डर लॉबीला वाढवून देण्यासाठी 60 फूटी ३० फूटी  अशा मोठ्या रस्त्यांच्या योजना केलेल्या दिसून येते. हे सगळे बिल्डर लॉबीला धार्जिणे असे धोरण असल्याचे सभेला सगळ्या उपस्थितांचे मत पडले. नवीन आराखडा 2034 विषयी हरकती नोंदविण्यासाठी अधिक वेळ म्हणजे महिना ते दीड महिना पंचेचाळीस दिवसाचा वेळ वाढवून देण्यात यावा असेही यावेळी ठरले.विविध विषयांवर सभेत उपस्थित बांधवांनी सीमांकन, विस्तारित सीमांकन विषयी वरील सूचना व मते मांडली. या सभेत अशी माहिती देण्यात आली की विस्तारीत नवीन नकाशे हे प्रथम फिशरीज या विभागात गेले पाहिजेत मग तेथून पास झाल्यानंतर नगर विकासाकडे ते पाठवून मग त्यावर उचित कार्यवाही झाली पाहिजे, असे असताना फिशरीज कडे सर्व नकाशे पाठविले होते कां ?

कोळीवाड्यांच्या आजूबाजूला ज्या आपल्या मूळ जागा पूर्वीपासून आपल्या वापरात आहेत, त्याविषयी प्रशासन काही बोलत नाहीत. हे पूर्णपणे चुकीचे असून  आपण विस्तारित सीमांकनाविषयी आग्रह धरला पाहिजे. आपल्या मालकीच्या जागा आपल्या झाल्याच पाहिजेत त्यासाठी घरातील सगळ्यांनी, संस्थांनी, मंडळांनी, मच्छीमार सहकारी सोसायटीने वेगळ्या हरकती नोंदवायला हव्यात. कोळीवाड्याच्या अवतीभवती असलेल्या जमिनी या एखाद्या आश्रमाला, संस्थांना बिल्डर लॉबीला वाटल्या गेल्या आहेत. आपली एकजूट नाही. त्यामुळे आपल्याला हा लढा एकजुटीने अजून तीव्र केला पाहिजे. नाहीतर आपले हक्क डावलले जातील. सीमांकित नकाशे पंचनामा सह मिळाले पाहिजेत. नसतील तर ते मागणी करुन मिळवा. हरकती नोंदवा. मनोरी, गोराई या कोळीवाड्यां मध्ये व आजूबाजूला भरपूर जागा शिल्लक आहेत. त्या आपल्या कोळीवाड्याच्या मालकीच्या आहेत. पण टुरिझमच्या नावाखाली येथे अतिक्रमणे सुरू आहेत. या सगळ्या समस्यांसाठी मोठा लढा उभारावा लागेल असे आवाहन यावेळी करण्यात आले.  

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकाराज्य सरकार