Join us

आरोप-प्रत्यारोपांत मनसेकडून थीम पार्कचे भूमिपूजन

By admin | Updated: August 24, 2014 01:47 IST

आरोप-प्रत्यारोपांच्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडुप पूर्वेकडे भविष्यात साकारणा:या थीम पार्कचे भूमिपूजन केले.

मुंबई : आरोप-प्रत्यारोपांच्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडुप पूर्वेकडे भविष्यात साकारणा:या थीम पार्कचे भूमिपूजन केले. थीम पार्कची जागा आपली आहे, असा आरोप मिठागर विभागाने केला. शिवसेनेने हाच धागा पकडून थीम पार्कला विरोध केला,  तर या जागेशी मिठागर विभागाचा काहीही संबंध नसून सर्व परवानग्या मिळविल्याच्या दाव्यावर आमदार मंगेश सांगळे ठाम राहिले.
आमदार सांगळे यांच्या पुढाकाराने हे माझे गाव हे थीम पार्क साकारणार आहे. पूर्वद्रुतगती मार्गाला लागून असलेल्या भांडुपेश्वर कुंड या प्राचीन तलावाभोवती हा उपक्रम उभारला जाणार आहे. मात्र कालपासूनच या थीम पार्कवरून वाद सुरू झाला. हे पार्क ज्या जागेवर उभारले जाणार आहे ती जागा मिठागर विभागाची आहे. 
या पार्कबाबत सांगळे यांनी या विभागाशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. या पार्कला विभागाने मंजुरीही दिलेली नाही, असा दावा करीत या विभागाने कांजूरमार्ग पोलीस ठाण्याला तक्रार अर्ज सादर केला. या तक्रारीने शिवसेनेच्या हाती आयते कोलीत दिले. काल रात्री पोलिसांनी मिठागर विभागाचे अधिकारी आणि आमदार सांगळे यांना समक्ष ठेवून दोघांकडे असलेली कागदपत्रे पडताळली.  यावेळी सकाळपासूनच शिवसैनिकांनी भांडुपेश्वर कुंडाजवळ गर्दी केली होती. या प्रकल्पाच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. 
लोकमतने सांगळे यांना या वादाबाबत विचारले असता ते म्हणाले, की मुळात हा भूखंड मिठागर विभागाचा नाही. या भूखंडाच्या प्रॉपर्टी कार्डावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख आहे.  शासनाने भांडुपेश्वर कुंडाला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे.  या 
थीम पार्कसाठी ज्या परवानग्या आवश्यक आहेत, त्या सर्व घेण्यात आल्या आहेत.
 
सकाळी अकराच्या सुमारास या पार्कचे भूमिपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र या वादाच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांनी आमदार सांगळेंना कृष्णकुंजवर बोलावून घेतले. साधारण दोनेक तास चर्चा केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास प्रमुख पदाधिका:यांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी या पार्कचे भूमिपूजन केले.