मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट ओसरलेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढते आहे. ज्याप्रमाणे देश जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ दिलीत त्याप्रमाणेच महाराष्ट्र जिंकण्यासाठीही द्या’, असे आवाहन भाजपाचे खासदार व भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांनी दिंडोशीतल्या मतदारांना केले. दिंडोशीतून भाजपातर्फे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ तिवारी आणि अभिनेते मनोज सिन्हा काल दिंडोशीत आले होते. या दोघांनी संध्याकाळच्या सत्रात संपूर्ण दिंडोशी मतदारसंघात फिरून कंबोज यांचा प्रचार केला. तिवारींच्या रॅलीला भाजपा, रिपाइंच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कंबोज यांनी निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून त्यांचा प्रचार करण्यासाठी दिंडोशीत भोजपुरी अभिनेत्यांची मांदियाळी उतरली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रवी किशन यांनी रॅली काढून कंबोज यांचा प्रचार केला. तर काही दिवसांपूर्वी कॉमेडीयन राजू श्रीवास्तव हेही कंबोज यांच्या प्रचारार्थ दिंडोशीत अवतरले होते. श्रीवास्तव यांना पाहण्यासाठी येथील स्थानिक रहिवाशांनी एकच गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
भोजपुरी अभिनेत्यांची मांदियाळी
By admin | Updated: October 9, 2014 01:53 IST