Join us

भिवंडी-रांजणोली नाक्यावर वाहतूककोंडी

By admin | Updated: December 28, 2014 23:31 IST

नाताळची सुट्टी आणि विकेण्ड याचा फायदा घेत अनेक चाकरमानी आपली स्वत:ची वाहने घेऊन पर्यटनासाठी घराबाहेर पडले.

कल्याण : नाताळची सुट्टी आणि विकेण्ड याचा फायदा घेत अनेक चाकरमानी आपली स्वत:ची वाहने घेऊन पर्यटनासाठी घराबाहेर पडले.मात्र ठिकठिकाणी होणा-या ट्रॅफिक जाम मुळे त्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.अशीच परिस्थिती भिवंडी-नाशिक बायपास रोडवरील रांजणोली नाक्यावर शनिवारी सायंकाळी या कोंडीचा कळस झाला. या बायपास रोडला भिवंडी आणि कल्याणहून येणारे रस्ते एकाच ठिकाणी येऊन मिळत असल्याने रांजणोली नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मुंबईपासून जवळच असलेल्या नाशिकला चाकरमान्यांची मोठया प्रमाणावर पसंती असते.त्यामुळे नाशिकला जाण्यासाठी भिवंडी बायपास राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करावा लागतो.या महामार्गावर रांजणोली नाका आहे.कल्याण आणि भिवंडी कडून येणारे रस्ते याठिकाणी मिळत असतात त्यामुळे येथे कायमच वाहतूककोंडी असते.मात्र नाताळची सुट्टी आणि विकेण्ड आल्यामुळे अनेक चाकरमानी आपापली खाजगी वाहने घेऊन पर्यटनासाठी निघाली.परिणामी वाहतुक कोंडीत अधिकच भर पडली. त्यामुळे रांजणोली नाक्यावरती एक-एक रस्त्यावरची वाहतूक खुली करण्यासाठी १५-१५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत होता. त्यामुळे अर्धा ते एक तासभर वाहने जागची हालतही नव्हती.या जम्बो ट्रॅफिक जाम मुळे वाहनचालक आणि प्रवासी पुरते बेजार झाले होते.यासंदर्भात कोनगाव वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता नाताळ सणाच्या आणि शनिवार,रविवारच्या सुट्टया एकत्रित आल्यामुळे मोठया संख्येने नागरीक घराबाहेर पडले आहेत त्यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे.परंतू लवकरात लवकर ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)