Join us  

महापरिनिर्वाण दिनासाठी जमला भीमसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 1:53 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या हजारो अनुयायींसाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत, सामाजिक संस्था आणि संघटनांनी वैद्यकीय सुविधा आणि भोजन व्यवस्था केलेली आहे.शिवाजी पार्कवर यंदा अंथरलेल्या हिरव्या रंगाच्या कापडी जाळीमुळे अनुयायींची धुळीच्या त्रासापासून मुक्तता झाली आहे. मंगळवारपासूनच हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादनासाठी चैत्यभूमीवर दाखल आहेत. बुधवारी सायंकाळीही अनुयायांची रांग मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचली होती. दादर रेल्वे स्थानकाकडून चैत्यभूमीच्या दिशेने येणाऱ्या अनुयायींना भीमसैनिक मार्गदर्शन करत होते. रस्त्यालगत बाबासाहेब, गौतम बुद्ध यांच्या मूर्ती आणि छायाचित्रे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याशिवाय बुद्धवंदना, संविधान आणि कॅलेंडरच्या प्रती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.मुंबई मनपाने शिवाजी पार्कवर अनुयायींची चोख व्यवस्था केलेली आहे. मैदानावर अंथरलेल्या हिरव्या चादरीमुळे धुळीच्या त्रासातून अनुयायींची मुक्तता केली. याशिवाय मोबाइल टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या लावत अनुयायांची सर्व व्यवस्था मनपाने केली आहे. याशिवाय आॅल इंडिया हिंदुस्तान पेट्रोलियम एससी-एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी २५ हजार लोकांची भोजनव्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी सुमारे ३५ हजार अनुयायींनी भोजनाचा लाभ घेतला. गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत अल्पोपहारासह टोपी व पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फेही शिवाजी पार्क मैदानावर वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.।राजकीय बॅनरला ऊतआगामी निवडणुका लक्षात ठेवून विविध राजकीय पक्षांनी चैत्यभूमी परिसरात भरमसाट बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे चैत्यभूमी परिसर विद्रूप दिसत आहे. अनुयायींना मार्गदर्शक ठरतील, असे बॅनर लावण्याऐवजी मतांसाठी लावलेल्या बॅनरबाबत अनुयायींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.मनपाकडून प्रकल्प प्रदर्शनमुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे चित्रप्रदर्शन शिवाजी पार्क मैदानात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात मनपाकडून राबविण्यात येणाºया नाट्यगृह, तरण तलाव, उद्यान, उड्डाणपूल आणि विविध प्रकल्पांचा समावेश आहे.लक्षवेधक मूर्तीगौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुबक मूर्ती विक्रीसाठी मैदानात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तांब्याच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. एका स्टॉलवर ठेवण्यात आलेली सात फूट उंच व २७० किलो वजनाची तांब्याची मूर्ती भलतीच भाव खाऊन जात आहे.।बांधकाम कामगारांसाठी विविध योजनांची माहिती उपलब्धभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर पश्चिमेकडील चैत्यभूमी येथे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांच्या जनजागृतीकरिता शिवाजी पार्क येथे स्टॉल उभारण्यात आला आहे.महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या कामगार वर्गाला या स्टॉलवर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राज्याचे कामगार आयुक्त राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी मंडळाच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये क्रमांक ए - ५ स्टॉल लावण्यात आला आहे.या स्टॉलवर बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीपुस्तिका, माहितीपत्रक, नोंदणी अर्ज यांचे मोफत वितरण केले जाणार आहे. या वेळी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चु. श्रीरंगम, कामगार उपायुक्त शिरीन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.।शांत चैत्यभूमी अभियानमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने पाळला जावा, म्हणून गेल्या तीन वर्षांपासून शांत चैत्यभूमी अभियान राबविले जात आहे. सोशल एज्युकेशन मूव्हमेंट (सेम) या संस्थेमार्फत हे अभियान ४ ते ६ डिसेंबरदरम्यान राबविले जाते. या अभियानात महिला कार्यकर्त्या हाती बॅनर घेऊन, संपूर्ण शिवाजी पार्क मैदान आणि चैत्यभूमी नजीकच्या परिसरात शांतपणे महामानवाला अभिवादन करण्याचे आवाहन करतात.याबाबत संस्थेचे मुंबई प्रमुख प्रकाश गायकवाड म्हणाले की, ६ डिसेंबर हा दु:खाचा दिवस असून, त्या दिवशी डीजे किंवा अन्य प्रकारच्या वाद्यांची गरज नाही. त्यामुळे या दिवशी चैत्यभूमी व शिवाजी पार्क मैदानावर सीडी विक्रेत्यांना हेड फोन्स लावून विक्री करण्याचा पर्याय संस्था सुचविते. कलाकारांनीही भोंग्याचा वापर न करता गांभीर्याला बाधा होणार नाही, अशा पद्धतीने कलाविष्कार सादर करण्याचे आवाहन संस्था करत आहे. सतत तीन दिवस प्रभातफेरी काढून संस्था परिसरात शांतता राखण्याबाबत जनजागृती करत आहे.