Join us  

भीमनगरवासीयांना तीन वर्षांच्या लढ्यानंतर अखेर पाणी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:52 AM

केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकाला घर घर पाणी देण्याचे जाहीर करतात

मुंबई : मानखुर्द येथील भीमनगर (महाराष्ट्रनगर) वस्तीमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्षे चातकासारखी प्रतीक्षा केल्यानंतर अखेर पाणी हक्क समिती आणि वस्तीमधील कार्यकर्त्यांनी मिळून संविधानिक पाणी अधिकार मिळविला आहे. २०१७ साली येथील रहिवाशांनी महापालिकेकडे जल जोडणीसाठी अर्ज केला होता; आणि आज अखेर त्यांना जलजोडणी प्राप्त झाली आहे. यावर पेढे वाटत, ढोल-ताशांचा गजर करीत पाणी हक्क समितीच्या कार्यकर्त्यांसह महिला वर्ग आणि छोट्या मुला-मुलींच्या हस्ते जलजोडणीचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकाला घर घर पाणी देण्याचे जाहीर करतात. मात्र अनेक वस्त्या पाण्यापासून वंचित असतात. मानखुर्दमधील ही वस्तीदेखील कित्येक वर्षे पाण्यापासून वंचित होती. मुंबई महापालिकेने भीमनगरला पाण्यापासून वंचित ठेवले होते. परिणामी, वस्तीला पाणी मिळवून देण्यासाठी पाणी हक्क समितीने लढा उभारला. सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला; आणि शुक्रवारी अखेर वस्तीमधील जल जोडणीसाठी नवीन जलवाहिनी मंजूर करून घेतली. भीमनगर येथील नागरिकांनी महापालिकेच्या परिपत्रकानुसार आॅनलाइन पद्धतीने ५२ नळ जोडणींसाठी २०१७ मध्ये अर्ज केले. मात्र भीमनगरच्या बाजूला एमएमआरडीएचे मेट्रो कार शेड उभे राहत असल्याचे कारण पुढे करीत या प्रकरणी टोलवाटोलवी केली जात होती. अखेर ३ वर्षांनी येथील रहिवाशांना हक्काचे पाणी मिळाले आहे, असे येथील रहिवासी अबरार भाई यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईपाणी