Join us  

दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करा, भीम आर्मीचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 2:54 PM

दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी करत भीम आर्मी संघटनेने बुधवारी आंदोलन केले.

मुंबई - गेल्या काही महिन्यात राज्यात नावारूपाला आलेल्या भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने बुधवारी दादर स्थानकाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे केले. दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर करत या स्थानकाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस म्हणा' असे संदेश लिहिलेले फलक दादर सेन्ट्रल व वेस्टर्न रेल्वेवर लावले. भीम आर्मीच्या स्टिकरकडे दादर सेंट्रल आणि वेस्टर्नवर येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष या लावण्यात आलेल्या नवीन नावाकडे जात होते. 

भीम आर्मीचे कार्यकर्ते आणि चैत्यभूमीला आलेले भीमसैनिकही दादर स्थानकात लावण्यात आलेल्या या नवीन फलकासोबत सेल्फी काढून समाधान मानत असल्याचे चित्र बुधवारी दादर स्थानकात निर्माण झाले होते. नामांतराचे हे स्टिकर दादर स्थानकात ज्या-ज्या ठिकाणी फलाटावर स्थानकाची माहिती देणारे फलक होते. त्या ठिकाणी आणि जिथे जागा मिळेल त्या-त्या ठिकाणी लावण्यात आली होती.

दादर पूर्वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे ऐतिहासिक निवासस्थान व आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आहे तर पश्चिमेला दादर चौपाटी येथे चैत्यभूमी आहे. आंबेडकरी चळवळीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या स्थानकाला दादर हे नाव संयुक्तिक वाटत नाही. कारण दादर या नावाला काही अर्थबोध होत नाही. 

केंद्र सरकारने व्हिक्टोरिया टर्मिनस  व्हिटीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव दिले त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने व पावन झालेल्या दादरला त्यांचेच या मागणीकडे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे प्रातिनिधिक नामांतर आंदोलन केले असल्याची माहिती भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे व मुंबई प्रमुख अॅड रत्नाकर डावरे यांनी दिली आहे .

मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांनी येत्या आठवड्याभरात यासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर त्यांचे सर्व कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला आहे.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरमुंबई