Join us  

भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद नजरकैदेत; राज्यात कार्यकर्त्यांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 6:17 AM

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जांबोरी मैदानावरील आझाद यांची शनिवारची सभा रद्द झाली.चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या मनाली हॉटेलमध्ये ठेवले आहे. सभेचे आयोजन करणाºया अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी मध्यरात्रीच ताब्यात घेतले. आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याचा व्हिडीओ शनिवारी सकाळी व्हायरल होताच, शेकडोकार्यकर्ते मनाली हॉटेलबाहेर धडकले आणि त्यांनी पोलीस व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली.त्यामुळे पोलिसांनी संघटनेचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड, मराठवाडा विभागप्रमुख बलराज दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर, अ‍ॅड. अखिल शाक्य, प्रवीण बनसोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली. आझाद यांना भेटण्यासाठी गेलेले विद्रोही कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे यांनाही पोलिसांनी अटक केली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हॉटेल परिसरात जमावबंदी लागू करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. भीम आर्मीच्या मालाड, दादर, शिवाजी पार्क, घाटकोपर, समतानगर, दिंडोशी येथील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.सुटकेची मागणीचंद्रशेखर आझाद यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे नेते अविनाश महातेकर यांच्यासह अनेक संघटनांनी केली आहे.‘हॉटेल सोडणार नाही’सभा रद्द केल्यानंतर पोलिसांनी आझाद यांची मुक्तता करत असल्याचे सांगितले. मात्र अटक केलेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांची सुटका केल्याचे आदेश दाखवत नाहीत, तोपर्यंत हॉटेल सोडणार नसल्याचा पवित्रा चंद्रशेखर आझाद यांनी घेतला.

टॅग्स :मुंबई