Join us

बँक घोटाळ्यांनंतर पालिकाही गुंतवणुकीबाबात सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 05:21 IST

दोन खासगी बँका वगळल्या : ७९ हजार कोटी रूपयांची काळजी

मुंबई : बँक घोटाळ्याचे अनेक प्रकार उघड होऊ लागले आहेत. त्यात पंजाब अँड महाराष्ट्र कॉ. बँक आर्थिक संकटात सापडल्यामुळे देशातील मुंबई महापालिका सावध झाली आहे.

महापालिकेचे तब्बल ७९ हजार कोटी रुपये मुंबईतील विविध बँकांमध्ये मुदत ठेवींवर गुंतविण्यात आले आहेत. आणखी सहा नवीन बँकांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, दोन खासगी बँकांबाबत शाश्वती नसल्याने ऐन वेळी या बँकांना यादीमधून वगळण्यात आले आहे.कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, ठेकेदारांच्या अनामत रक्कम, महसूल व मुदत ठेवींवर दरमहा मिळणारे कोट्यवधींचे व्याज असे एकूण ७९ हजार कोटी पालिकेकडे आहेत. ही रक्कम अनेक बँकांमध्ये विभागून गुंतविण्यात आली आहे. विविध बँकांमध्ये ठेवी ठेवण्यापूर्वी संबंधित बँकेकडून देण्यात येणाºया व्याजाचा आढावा महापालिका घेत असते. त्यानंतरच बँकांत ठरावीक ठेव गुंतविण्यात येत आहे. या मुदत ठेवींपैकी काही रक्कम मोठ्या पायाभूत प्रकल्प आणि बेस्ट उपक्रमासाठी वापरण्यात आली आहे.

मात्र, आयसीआयसीआय बँकेत एक हजार कोटी रुपये, एचडीएफसी बँकेत एक हजार कोटी रुपये, एक्सिस बँकेत प्रत्येकी ६०० कोटी रुपये आणि येस बँकेत ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कोटक महिंद्र बँकेत ५०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार आहेत.

ठेवींबाबत पालिकेचा निर्णयपालिकेने २० राष्ट्रीय बँकांत व एका सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि खासगी क्षेत्रातील सहा बँकांमध्ये काही कोटींच्या ठेवी गुंतविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापैकी दोन खासगी बँकांबाबत प्रसिद्ध झालेली वृत्त व बँक गॅरंटीबाबतच्या अडचणी लक्षात घेतल्यानंतर या बँकात गुंतवणूक न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.