Join us

लग्नाच्या आमिषाने फसविणारा अटकेत

By admin | Updated: October 9, 2014 01:25 IST

सोशल साइट्सवर लग्नाची मागणी घालून तरुणींना गंडा घालणा-या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली.

मुंबई : सोशल साइट्सवर लग्नाची मागणी घालून तरुणींना गंडा घालणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. किरण बागवे (२८) असे त्याचे नाव असून त्याने मुंबईसह अनेक राज्यांतील मुलांना लाखोंना गंडा घातल्याचे समोर आले.वांद्रे येथे राहणाऱ्या सीमाने (बदललेले नाव) सप्टेंबर २०१४ ला लग्नासाठी शादी डॉॅट कॉम या साइटवर नाव नोंदवले होते. काही दिवसांतच तिला या साइटवरून आरोपीने रिप्लाय दिला. त्यावरील फोन नंबरवरून आरोपीने या तरुणीशी संपर्क साधला. आपण दादर परिसरात राहत असून आयटी इंजिनीअर असल्याचे त्याने या तरुणीला सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये रोज बोलणे होऊ लागले. १५ दिवसांपूर्वी या आरोपीने तरुणीला लग्नाची मागणी घातली. त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्याच्या प्रोफाइलवर त्याने त्याच्याच एका सुंदर मित्राचा फोटो लावला. त्यामुळे तरुणीनेसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला.आठ दिवसांपूर्वी या आरोपीने आजारी असल्याचे सांगत तरुणीकडे पैशांची मागणी केली. एका गुन्ह्यात अडकल्याने पोलिसांनी खाती गोठवल्याने बँकेकडून पैसे काढू शकत नाही, अशी खोटी माहितीही त्याने तरुणीला दिली. तरुणीलाही त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटू लागला. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो पैसे मागायचा तेव्हा ही तरुणी त्याच्या एका खात्यात पैसे जमा करायची. अशा प्रकारे या आरोपीने तरुणीकडून १ लाख ५७ हजार ७५० इतकी रक्कम घेतली होती. काही दिवसांनंतर तो अचानक गायब झाला. तरुणीने याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा तरुण नागपूर येथे अशाच प्रकारे एका तरुणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आयटी इंजिनीअर असल्याचे भासवणारा हा आरोपी केवळ अकरावी पास असल्याचे उघड झाले. तसेच त्याने अशाच प्रकारे अनेक सोशल साइट्वर प्रोफाइल तयार करून अनेक मुलींना गंडा घातल्याचेही समोर आले आहे. (प्रतिनिधी)