Join us

वेतनासाठी बेस्ट कामगार ताटकळत़़

By admin | Updated: March 14, 2017 07:35 IST

आधीच आर्थिक विंवचनेत असलेल्या बेस्ट उपक्रमापुढे नवीन संकट उभे राहिले आहे़ उत्पन्न आणि खर्चातून शिल्लक काहीच राहत नसल्याने तिजोरीत खडखडाट आहे़

मुंबई : आधीच आर्थिक विंवचनेत असलेल्या बेस्ट उपक्रमापुढे नवीन संकट उभे राहिले आहे़ उत्पन्न आणि खर्चातून शिल्लक काहीच राहत नसल्याने तिजोरीत खडखडाट आहे़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचीही पंचाईत झाली आहे़ तर नेहमीच लेटमार्क असलेले वेतन या महिन्यात पंधरवडा उलटला तरी हातात न पडल्याने, कर्मचारीही हवालदिल झाले आहेत़‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालविण्यात येणारा बेस्ट उपक्रम गेल्या दशकापासून आर्थिक संकटात आहे़ वाहतूक विभागाची तूट वर्षागणिक वाढत असून, कर्जाचे डोंगरही तीन हजार कोटींवर पोहोचले आहेत. त्यामुळे कर्ज काढून सण साजरे करणे हे बेस्ट उपक्रमासाठी नित्याचेच झाले आहे़ उत्पन्नाचे अनेक पर्याय शोधल्यानंतरही तिजोरीमध्ये भर पडण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे़ यामुळे अनेक वेळा कर्ज काढूनच कामगारांचे वेतन दिले जात आहे़मात्र पहिल्यांदाच मार्च महिन्याची १३ तारीख उलटली, तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचे वेतन कामगार-कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही़ कामगारांचे वेतन देण्यासाठी बँकांशी कर्जाबाबत बोलणी सुरू असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़ मात्र, कामगारांचे वेतन देण्यासाठी कोणतीच प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही़ यामुळे कामगारांना मात्र रोजचे आर्थिक गणित चुकविणे कठीण होऊन बसले आहे़ (प्रतिनिधी)