Join us  

बेस्टचे रोजंदारी कामगार कायम होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:24 AM

जवळपास महिनाभर संपावर असलेल्या बेस्ट उपक्रमातील रोजंदारी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. उपक्रमाने मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स

मुंबई : जवळपास महिनाभर संपावर असलेल्या बेस्ट उपक्रमातील रोजंदारी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. उपक्रमाने मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेत कामगारांना ३ हजार रुपये पगारवाढ दिली आहे. शिवाय, रोजंदारी कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासित केले आहे.बेस्ट उपक्रमाने मागण्या मान्य केल्याने संबंधित कामगारांना किमान वेतन म्हणून १५ हजार ३०९ रुपये दराने वेतन मिळणार असल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली. गायकवाड यांनी सांगितले की, शासनाच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ऊर्जा व उद्योग विभागातील कामगारांना किमान वेतन कायदा १९४८नुसार वेतन प्रदान करण्याचे आदेश २४ फेब्रुवारी २०१५ रोजी जारी केले होते. त्यानुसार बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील रोजंदारी कामगारांना प्रत्येक महिन्याला १५ हजार ३०९ रुपये वेतन देण्याचे बेस्ट प्रशासनाने मान्य केले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्यासह बेस्टचे महाव्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी आणि युनियनचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या बैठकीत बेस्ट उपक्रमात गेल्या १० वर्षांपासून प्रतिवर्षी २४० दिवस काम करणाºया कामगारांना येत्या ३ महिन्यांत बेस्टमध्ये सामील करण्याचा निर्णय घेणार असल्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे.या समझोत्यामुळे संपावर असलेल्या रोजंदारी कामगारांनी वडाळा आगारासमोर गुलाल उधळून फटाक्यांच्या आतशबाजीत विजय साजरा केला. ढोल-ताशांच्या आवाजातच गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेत असल्याची घोषणाही युनियनने या वेळी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर बेस्ट प्रशासनाने केलेल्या समझोत्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. अन्यथा पुन्हा एकदा युनियन आंदोलनासाठी तयार असल्याचेही कामगारांनी सांगितले.

टॅग्स :बेस्टमुंबई