Join us  

‘बेस्ट’चा पास दीडशेने महाग; आता ७५० ऐवजी मोजा ९०० रुपये

By जयंत होवाळ | Published: February 29, 2024 7:45 PM

दैनंदिन पासमध्येही १० रुपये वाढ, आजपासून नवीन दर लागू

मुंबई : बेस्ट बसने प्रवास करताना गर्दीचा सामना करीत सुट्टे पैसे देऊन तिकीट घ्यावे लागते. रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी तिकीट घेण्याऐवजी मासिक पासचा पर्याय निवडला; मात्र या पाससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ७५० रुपयांऐवजी ९०० रुपये, तर दैनंदिन पाससाठी ५० ऐवजी ६० रुपये द्यावे लागणार आहेत. मासिक पासमध्ये १५० रुपये, तर दैनंदिन पासमध्ये दहा रुपयांची वाढ केली आहे. याची १ मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे. दैनंदिन तिकिटात वाढ करण्यात आलेली नाही.

दैनंदिन आणि मासिक पासनुसार अमर्याद प्रवास, सर्व एसी बसमधून प्रवासाची सुविधा कायम असल्याचे ‘बेस्ट’ने स्पष्ट केले आहे. नव्या सुधारित दरांनुसार ४२ ऐवजी १८ बस पास करण्यात आले आहेत. बस पास सहा रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपयांपर्यंतच्या वातानुकूलित आणि विनावातानुकूलित प्रवासभाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना २०० रुपयांचा मासिक बस पास उपलब्ध असून या बसपासच्या माध्यमातून अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे.

१० लाख ४० हजार ९६५ प्रवाशांना आर्थिक फटकातोट्यात जाणाऱ्या ‘बेस्ट’चे उत्पन्न वाढवण्यासाठी, सुट्ट्या पैशांची कटकट संपवण्यासाठी सुधारित दररचना करण्यात आली आहे; तसेच महसूल वाढवण्यासाठी आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या पास सुविधेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी दर सुधारणा केल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून स्पष्ट केले आहेत. दरवाढीमुळे १० लाख ४० हजार ९६५ प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. रेल्वेनंतर सर्वाधिक प्रवासी ‘बेस्ट’ने प्रवास करतात. ‘बेस्ट’ बसने दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात.

अशी आहे नवी योजना- ज्येष्ठ नागरिकांना मासिक बस पासमध्ये असलेली ५० रुपये सवलत कायम ठेवण्यात आली आहे. साप्ताहिक बस पासमध्ये मात्र कोणतीही सवलत नाही.- पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेशधारक विद्यार्थ्यांना; तसेच ४० टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बस पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.- ‘बेस्ट’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ९०० रुपये आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी असलेल्या वार्षिक ३६५ रुपयांच्या बस पास दरामध्ये बदल केलेला नाही.- साप्ताहिक पासनुसार ६ रुपयांपर्यंतच्या फेरीकरिता ७० रुपये, १३ रुपयांपर्यंतच्या बस फेरीसाठी १७५ रुपये, १९ रुपयांपर्यंत २६५ आणि २५ पर्यंतच्या फेऱ्यांसाठी ३५० रुपये.

टॅग्स :बेस्टमुंबई