Join us

बेस्ट भाडेवाढीचे दोन दणके !

By admin | Updated: December 18, 2014 01:27 IST

निवडणुकीच्या काळात भाडेवाढ टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाला दीडशे कोटी दिल्यानंतरही या वर्षीची भाडेवाढ फेब्रुवारी २०१५पासून लागू होणार आहे़

मुंबई : निवडणुकीच्या काळात भाडेवाढ टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाला दीडशे कोटी दिल्यानंतरही या वर्षीची भाडेवाढ फेब्रुवारी २०१५पासून लागू होणार आहे़ भाडेवाढ रद्द करण्यासाठी घेतलेली ही रक्कम बसगाड्यांच्या खरेदीकरिता वापरण्यात येणार असल्याचे सांगून बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत़ सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीनेही बेस्ट अर्थसंकल्पाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देऊन प्रवाशांवर फेब्रुवारी आणि एप्रिल २०१५ अशा दोन भाडेवाढ लादल्या आहेत. पालिका महासभेच्या मंजुरीनंतर यावर अंमल होईल़१ एप्रिल २०१४ पासून प्रस्तावित किमान १ ते ५ रुपयांची भाडेवाढ रद्द करण्यासाठी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला दीडशे कोटींचे अनुदान देण्याची हमी दिली़ त्यानुसार ६७ कोटींपर्यंत दोन हप्त्यांमध्ये अनुदान देण्यात आले़ मात्र बेस्टने हे अनुदान खिशात घातल्यानंतर आता शब्द फिरवला आहे़ आलेली तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य असल्याचा युक्तिवाद महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी मांडला आहे़२०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन आर्थिक वर्षांकरिता दोन रुपये भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आलेला अर्थसंकल्प स्थायी समितीने आज मंजूर केला़ दीडशे कोटी रुपये दिल्यास ही भाडेवाढ रद्द होईल, अशी भूमिका यापूर्वी प्रशासनाने घेतली होती़ मात्र ही रक्कम मिळत असतानाही फेब्रुवारी आणि एप्रिल अशा दोन भाडेवाढ मंजूर करून घेतल्या़ (प्रतिनिधी)