Join us  

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’साठी शस्त्रासह उचलले लेखणीचेही अस्त्र - बी.जी. शेखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:59 AM

-  मनीषा म्हात्रेमुंबई : शस्त्राबरोबर पोलिसांनी लेखणीचे अस्त्र उचलले आणि त्यांच्यात दडलेल्या सर्जनशील साहित्यिकाची जाणीव सर्वांनाच करून दिली. ...

-  मनीषा म्हात्रे

मुंबई : शस्त्राबरोबर पोलिसांनी लेखणीचे अस्त्र उचलले आणि त्यांच्यात दडलेल्या सर्जनशील साहित्यिकाची जाणीव सर्वांनाच करून दिली. त्यामुळेच तर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्य संमेलन २०१९’कडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यानिमित्ताने संमेलनाध्यक्ष तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांच्याकडून जाणून घेतलेला संमेलनाचा प्रवास...

प्रश्न - पोलिसांचे साहित्य संमेलन आयोजित करावे, ही कल्पना कशी सुचली?पोलीस आपल्या कर्तव्याशी २४ तास बांधलेला असतो. कुटुंबाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. अशात प्रसारमाध्यमांतून सिनेमा, नाटकांमध्ये नेहमीच खिल्ली उडविलेला पोलीस कारवाईने व्यथित झालेल्यांकडून सातत्याने टीकेचा लक्ष्य झालेला दिसतो. समाजातील जडणघडणीचा साक्षीदार म्हणून सत्यावर आधारित अनुभवाचा साठा त्याच्याकडे असतो. त्यामुळेच त्याच्या हाती लेखणीचे अस्त्र यावे तसेच समाज आणि पोलीस यातील दरी भरून काढता यावी यासाठी साहित्य संमेलन हे हक्काचे व्यासपीठ ठरू शकेल, असा विचार डोक्यात आला आणि पोलिसांचे साहित्य संमेलन आयोजित करण्याची कल्पना सुचली.

प्रश्न - पोलीस दलातील साहित्यिक आणि त्याचा दृष्टिकोन कसा असेल?पोलीस हा प्रत्यक्ष घटनेचा जवळचा साक्षीदार असतो. त्यामुळेच समाजातील चांंगल्या-वाईट घटना साहित्याच्या रूपात मांडता आल्या तर ते साहित्य समाज जीवनाचे खरे प्रतिबिंब असलेले समाजाला वास्तवाचा आरसा दाखवणारे सशक्त साहित्य ठरू शकते. हे संमेलन पोलिसांचे पहिले संमेलन ठरेल.

प्रश्न - कल्पना अमलात आणताना अडचणी आणि आव्हाने?मला स्वत:ला साहित्याची आवड असल्याने १० वर्षांपासून याचा विचार मनात घोळत होता. अखेर अडीच महिन्यांपूर्वी हा विचार वरिष्ठांपुढे मांडला. पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी होकार देताच, राज्यातील पोलीस साहित्यिकांचा शोध सुरू केला. एवढ्या मोठ्या फौजफाट्यातून निवड करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र त्यातून आम्हाला १७० पोलीस साहित्यिक मिळाले.

प्रश्न-महिलांचे प्रमाण कसे आहे?१७० पैकी ३५ ते ४० महिला साहित्यिकांचा यात सहभाग आहे. यात पोलीस पत्नींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अनेक महिलांना राज्यस्तरावर पुरस्कारही मिळाले आहेत.

पुढच्या वर्षी काय बदल असतील?आमच्या या उत्साहात समाजानेही सहभागी व्हावी, अशी संकल्पना पुढच्या वर्षी असेल. त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत.असे असणार संमेलन...दिवसभर चालणाऱ्या संमेलनात अंमलदारापासून अप्पर पोलीस महासंचालकांमध्ये पोलीस साहित्याचा आढावा, कवी संमेलन, पोलीस शौर्यगाथा, परिसंवाद, मुलाखतीबरोबर वैचारिक चर्चासत्रांची मेजवानी असणार आहे.समाजातील जडणघडणीचा साक्षीदार म्हणून सत्यावर आधारित अनुभवाचा साठा त्याच्याकडे असतो. त्यामुळेच त्याच्या हाती लेखणीचे अस्त्र यावे तसेच समाज आणि पोलीस यातील दरी भरून काढता यावी यासाठी साहित्य संमेलन हे हक्काचे व्यासपीठ ठरू शकेल.- डॉ. बी.जी. शेखर(उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल)

टॅग्स :पोलिस