मुंबई : महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये दैनंदिन वर्गाची सुरुवात तसेच सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिवजयंतीपासून सर्व प्रकारची महाविद्यालये, विद्यापीठांच्या शैक्षणिक दिनक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने होणे अपेक्षित होते. मात्र, शासन निर्णयातच अंमलबजावणी केव्हापासून करावी हे नमूद नसल्याने संभ्रमावस्थेत असलेल्या राज्यातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांकडून निर्णयाच्या प्रत्यक्ष अंलबजावणीला बगल देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हा निर्णय घेऊन शिवजयंतीपासून त्याच्या अंलबजावणीचे निर्देश दिले. मात्र या शासन निर्णयात शैक्षणिक संस्थांनी या निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून करावी याची स्पष्टता देण्यात आली नाही. शिवजयंतीच्या दिवशी अनेक संस्थांना सुट्टी असली तरी दुसऱ्या दिवशीही या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडूनही या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा नियोजित नाही अथवा अहवालही मागविण्यात आला नाही. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साध्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.अभिमानाची गोष्टआम्ही शाळेत असताना ज्याप्रमाणे राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात व्हायची तशीच आता महाविद्यालयात असतानाही झाली तर अभिमानाचीच गोष्ट आहे. मात्र महाविद्यालयीन प्रशासनाने त्याची दखल घ्यायला हवी. - प्रेरणा कळंबे, विद्यार्थिनी, अकरावी, वाणिज्य शाखा