Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेतील बससेवा फायद्यात

By admin | Updated: February 11, 2015 22:34 IST

कामोठे आणि कळंबोलीला जोडणारी मानसरोवर - रोडपाली बससेवा प्रवासी आणि एनएमएमटीकरिता फायदेशीर ठरत आहे.

कामोठे : कामोठे आणि कळंबोलीला जोडणारी मानसरोवर - रोडपाली बससेवा प्रवासी आणि एनएमएमटीकरिता फायदेशीर ठरत आहे. आठ दिवसांत एनएमटीचा जवळपास सव्वादोन लाखांचा व्यवसाय झाला आहे. त्याचबरोबर हजारो प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गावर फेऱ्या वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कळंबोली वसाहतीपासून खांदेश्वर त्याचबरोबर मानसरोवर रेल्वेस्थानक दूर असल्याने त्या ठिकाणी जाण्याकरिता पूर्वी रिक्षाचा अवलंब करावा लागत होता. कळंबोली ते कामोठे सिग्नल ३० ते ४० रुपये आणि कामोठे ते मानसरोवर ३० ते ३५ रुपये असे सुमारे ६० रूपये खर्च येत असे. एनएमएमटीने ३ फेब्रुवारी रोजी रोडपाली ते मानसरोवर ही सरळ सेवा सुरू केली आहे. कळंबोलीतून रेल्वेस्थानक गाठण्याकरिता ही सेवा सोयीस्कर झाली आहे. त्याचबरोबर रिक्षावाल्यांची मक्तेदारी मोडून काढण्यास ही बस फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया गणेश पाटील या प्रवासाने दिली. (वार्ताहर)