मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला ३६ वर्षीय इमान अहमद हिचे सर्जरी करून ३० किलो वजन घटविण्यात आले आहे, अशी माहिती बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली. यानंतर लवकरच इमानचे २०० किलो वजन घटविण्याचे ध्येय डॉक्टरांच्या चमूने बाळगले आहे.सध्या इमानच्या विविध आजारांवर नियंत्रण आणण्याचे काम डॉक्टर करीत आहेत, या उपचारांना इमानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शस्त्रक्रिया करून इमानच्या शरीरातल्या पाण्याचे प्रमाण कमी केले जाणार आहे. यातून येत्या ४-५ महिन्यांत तिचे १०० किलो वजन कमी होईल, असा विश्वास डॉ. लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. इमानला मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड असे आजार आहेत. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सध्या इमानचे वजन ५०० किलो आहे, त्यामुळे तिच्यावर या परिस्थितीत बेरिएट्रिक शस्त्रक्रिया आता करता येणार नाही. तिचे वजन २५० किलो कमी झाल्यानंतर या शस्त्रक्रियेविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.वेदनाविरहित झोपेसाठी मशीनचा वापरइमानचा दिनक्रम सकाळी ७.३० वाजता सुरू होतो, फायबर आणि प्रोटिनच्या आहारानुसार, दरदिवशी तिला १२०० कॅलरीजचे बंधन आहे. तिची त्वचा पूर्ववत होण्यासाठी इमानला वॉटरबेडवर ठेवण्यात आले आहे. छोट्या बाळाप्रमाणे छोट्याशा ट्युबमधून इमानला दर दोन तासांनी भरविले जाते. तसेच, दिवसातून दोनदा फिजिओथेरपीची सेशन्स असतात. फुप्फुसाचा रोग असल्याने इमानला फार वेळ झोप लागत नाही. ती भारतात आल्यानंतर प्रवासानंतर थकूनही इमानला झोप लागली नव्हती, अशावेळी वेदनाविरहित शांत झोपेसाठी ‘स्लिप नॅप मशीन’चा वापर तिच्यासाठी करण्यात येतो.
इमानचे ३० किलो वजन घटले!
By admin | Updated: February 18, 2017 04:33 IST