Join us  

काँक्रिटीकरण ३१ मेनंतर नको, आयुक्तांच्या सूचना; पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 10:33 AM

मुंबईतील रस्त्यांची सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत.

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. काँक्रिट रस्ते मुंबईकरांना वाहतुकीसाठी योग्य स्थितीत असतील याची खबरदारी घ्यावी. पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतेही नवीन कामे हाती घेऊ नयेत, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी पालिका प्रशासनातील सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.

मुंबई महानगरपालिका हद्दीतील ३९८ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले. यापैकी पश्चिम आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे प्रगतिपथावर आहेत. निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्या आहेत. 

सिमेंट काँक्रिट रस्ते बनविण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो. जर प्राधान्याने रस्ते पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यादरम्यान रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आढळतात. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असुविधांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत सध्या सुरू असलेली सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील, अन्यथा कंत्राटदार व अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी अभियंत्यांची नियुक्ती-

खड्ड्यांसंदर्भातील तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी यंहाही २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली जाईल. ते निवडणूक प्रभागात प्रत्यक्ष फिरून खड्ड्यांसंदर्भात तक्रारीची स्वतःहून नोंद घेतील. 

तक्रार प्राप्त झाल्यावर परिमंडळनिहाय नेमलेल्या कंत्राटदारामार्फत मास्टिक अस्फाल्टद्वारे खड्डे बुजविण्यात आले आहेत का याची खातरजमा करतील, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, असा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बॅड पॅचसाठी कंत्राटदार-

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरदेखील दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरुस्तीही महानगरपालिका करणार आहे. मान्सूनपूर्व कामांचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून पालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजीची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकारस्ते सुरक्षा