Join us

सागरविहारच्या धर्तीवर होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण

By admin | Updated: June 1, 2015 02:13 IST

नवीन पनवेल येथील गाढी नदीलगतच्या होल्डिंग पाँडचा पावसाळी पाण्याचा निचरा करण्याबरोबरच आता विरंगुळ्यासाठीही उपयोग करून घेण्यात येणार आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलनवीन पनवेल येथील गाढी नदीलगतच्या होल्डिंग पाँडचा पावसाळी पाण्याचा निचरा करण्याबरोबरच आता विरंगुळ्यासाठीही उपयोग करून घेण्यात येणार आहे. सिडकोने या परिसराचे नवी मुंबईतील सागर विहारच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता सुमारे दीड कोटींचा खर्च अपेक्षित असून निविदाही प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.कळंबोलीबरोबरच सिडकोने नवीन पनवेल नोड विकसित केला आहे. २००५च्या प्रलयानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन पनवेल सेक्टर १४ येथील विसर्जन घाटाजवळ सिडकोने होल्डिंग पाँड तयार केला. या पाँडला पावसाळी नाले जोडण्यात आले असून गाढी नदी लगत असल्याने पावसाचे पाणी पात्रात निघून जाते. नदीला पूर आला तरी होल्डिंग पाँडमुळे पाणी शहरात घुसत नाही. त्यावेळी पंपाव्दारे पाँडमधील पाणी उपसण्याची सुविधाही करण्यात आलेली आहे. मात्र सध्या पाँडच्या आवारात झाडेझुडपे वाढली आहेत, डेब्रिज व कचराही टाकला जात असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. परिसरातील मित्रमंडळाकडून अधूनमधून विसर्जन घाटाची स्वच्छता केली जाते. मात्र ती तोकडी पडते. त्यामुळे हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक संदीप पाटील यांनी सिडकोला दिला. त्यानंतर सिडकोकडून सर्वेक्षण, आराखडा व अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे.