Join us

वांद्रे तलावाचे सुशोभीकरण होणार

By admin | Updated: November 22, 2014 01:07 IST

पुरातन वास्तू समितीकडे सुधारित आराखडा सादर करण्यात आल्याने वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणाला आठवड्याभरात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे़

मुंबई : पुरातन वास्तू समितीकडे सुधारित आराखडा सादर करण्यात आल्याने वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणाला आठवड्याभरात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे़ त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या तलावाच्या सुशोभीकरणाला सुरुवात होईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आज सांगितले़वांद्रे येथील स्वामी विवेकानंद सरोवराच्या सुशोभीकरणाचा निर्णय २००९ मध्ये घेण्यात आला़ त्यानुसार ३३ कोटी खर्च करून पायवाट, बोटिंगची सुविधा, लेझर शो, म्युझिकल फाउंटन, मत्स्यालय उभे राहणार होते़ मात्र हा प्रकल्प अनेक कारणांमुळे रखडला आहे़ अखेर या वर्षी पालिकेने यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली़ मात्र तलावाजवळ वॉक वे बांधल्यास तलावाचा आकार कमी होईल, असे मत पुरातन वास्तू समितीने नोंदविले होते़ याबाबत स्थायी समिती अध्यक्षांनी आज त्यांच्या दालनात बैठक बोलाविली होती़ तसेच अ‍ॅम्पी थिएटरमध्येही काही बदल करण्यात यावे, अशी सूचना समितीने पालिकेला केली होती़ याबाबत लोकमतने वृत्त दिले होते़ पालिकेने सुधारित आराखडा तयार केला असून तलावाची जागा कमी होणार नाही, अशी हमी पुरातन वास्तू समितीला दिली आहे़ याबाबतचा अहवालही समितीला सादर करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)