Join us  

‘ट्रॅफिकवाले हप्ता लेते है’ म्हणत वाहतूक पोलिसालाच मारहाण

By गौरी टेंबकर | Published: November 28, 2023 9:44 AM

वांद्रे पूर्वमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या बीकेसी वाहतूक विभागातील पोलिस हवालदाराच्या थोबाडीत मारण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला.

मुंबई : ट्रॅफिकवाले हप्ता लेते है, असे म्हणत वांद्रे पूर्वमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या बीकेसी वाहतूक विभागातील पोलिस हवालदाराच्या थोबाडीत मारण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. याविरोधात निर्मलनगर पोलिसांनी मोनू नावाच्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

तक्रारदार महेश चव्हाण (४९) हे बीकेसी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. या परिसरात येणाऱ्या वांद्रे स्थानक, भारतनगर तसेच नाबार्ड बीकेसी या ठिकाणी मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलान मशीनद्वारे फोटो काढून कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी ते वांद्रे स्टेशन पूर्व परिसरात कर्तव्यावर हजर होते. एमएमआरडीएचे वाहतूक वॉर्डन सुभाष कदम देखील त्यांना सहकार्य करत होता. 

सकाळी १०:३०च्या सुमारास वांद्रे स्थानक परिसरात युनिफॉर्म न घालता प्रवासी भाडे घेऊन जाणाऱ्या मोनू याला पाेलिसांनी पाहिले. 

  वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाेलिस त्याचा फोटो काढत असताना ‘ये रिक्षा मेरी नही है,’ असे म्हणत तो बाजूला असलेल्या रिक्षाजवळ जाऊन उभा राहिला.   चव्हाण यांनी त्याचा संबंधित रिक्षासोबत फोटो काढला.  फोटो काढताना मोनू हा चव्हाण यांच्याकडे पाहत ‘मुझे जान बुझकर तकलीफ देने के लिए ट्रॅफिकवाले आते है, और हप्ता भी लेते है, कमीने हरामखोर,’ असे उद्धटपणे बोलत त्याने पोलिसाला शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली आणि तिथून निघून गेला. 

हवालदाराच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल :काही वेळाने मोनूचा फोटो ज्या रिक्षा सोबत चव्हाण यांनी काढला होता, त्या रिक्षाचा चालक त्या ठिकाणी आला. त्याने स्वतःचे नाव जमील गाझी सांगितले. तितक्यात बीकेसी विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विकास माळी त्या ठिकाणी आले. त्यावेळी चव्हाण यांनी मोनूला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना उलटसुलट बोलत त्यांच्या थोबाडीत मारली. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस