मुंबई : पालिकेच्या सांताक्रूझ परिसरातील एच (पूर्व) कार्यालयात सोमवारी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करत शिरून दोन अभियंत्यांना मारहाण केली. या घटनेत हे अभियंते किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी पाच अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दीपक बापट आणि सत्यप्रकाश वाजपेयी अशी या हल्ल्यात जखमी अभियंत्यांची नावे आहेत. वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका कार्यालयात सोमवारी दुपारी स्थायी समितीची बैठक होती. त्या वेळी वांद्रे परिसरातील स्वच्छता, पाणी समस्यांवर चर्चा करण्यात आली. ही बैठक आटोपताच काही वेळानंतर चार ते पाच अनोळखी इसम कार्यालयात शिरले. त्यांनी बापट आणि वाजपेयी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार कळताच कार्यालयातील इतर कर्मचारी येथे गोळा होऊ लागले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर बापट आणि वाजपेयी यांनी वाकोला पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाच अनोळखी इसमांवर दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हात उगारणे, संगनमत अशा काही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव व्हावळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालिका कार्यालयात अभियंत्यांना मारहाण
By admin | Updated: September 29, 2015 01:33 IST