Join us

आरोग्य साक्षर व्हा, निरामय राहा

By admin | Updated: December 9, 2015 01:03 IST

आरोग्यविषयी असलेल्या अनास्थेमुळे अनेकांचे आजार गंभीर स्वरूप घेतात. आरोग्य साक्षरतेचे प्रमाण वाढल्यास अनेक आजारांना आळा घालता येऊ शकतो, त्याचप्रमाणे अनेक आजारांची उपचार प्रक्रिया

मुंबई : आरोग्यविषयी असलेल्या अनास्थेमुळे अनेकांचे आजार गंभीर स्वरूप घेतात. आरोग्य साक्षरतेचे प्रमाण वाढल्यास अनेक आजारांना आळा घालता येऊ शकतो, त्याचप्रमाणे अनेक आजारांची उपचार प्रक्रिया सहजसोपी होऊ शकते. त्यामुळे रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त रुग्णांना ‘आरोग्य साक्षर’ बनवण्याची मोहीम ‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्स’ने हाती घेतली आहे. ‘आरोग्य साक्षरता वाढल्यास आरोग्य सुदृढ राहील’ हा संदेश रुग्णांपर्यंत, त्यांच्या नातेवाइकांपर्यंत जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून पोहोचवला जाणार आहे. जेव्हा डॉक्टरकडे जातो, तेव्हा महत्त्वाचे कोणते तीन प्रश्न विचारावेत, डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्राविषयी कोणत्या गोष्टी समजून घ्याव्यात, याविषयी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली. माझी आरोग्यविषयक महत्त्वाची तक्रार कोणती, मी नक्की काय केले पाहिजे आणि हे करणे आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे, हे महत्त्वाचे तीन प्रश्न आहेत. रुग्ण डॉक्टरकडे तपासणीसाठी गेल्यावर त्यांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी समजून घेतली पाहिजेत. रुग्णांना वैद्यकीय क्षेत्राविषयी मूलभूत ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर वैद्यकीक्ष क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅडमिशन’, ‘डायग्नोसिस’, ‘स्पेशालिस्ट’, ‘मेडिकेशन मॅनेजमेंट’ अशा पायाभूत संज्ञा रुग्णांना माहीत असल्या पाहिजेत. यासाठी जनजागृती केली जाणार आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये गैरसमज होऊ नयेत म्हणून काही गोष्टी निवासी डॉक्टरांनादेखील सांगण्यात येणार आहेत. त्यामध्ये रुग्णाची सविस्तर माहिती घेणे, शिफ्ट बदलल्यावर रुग्णाची सविस्तर माहिती घेणे, उपचारांमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांना सामावून घेणे, रुग्णाला उपचाराआधीच उपचारांविषयी माहिती देणे, या गोष्टीदेखील निवासी डॉक्टर या सप्ताहात करणार असल्याचे डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)