Join us  

टिळक आणि सावरकरांच्या विचारांशी बांधिलकी ठेवा - अरविंद कुळकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 12:27 AM

लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांचे विचार आपण विसरलो आहोत, पण तसे करून चालणार नाही.

मुंबई : लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांचे विचार आपण विसरलो आहोत, पण तसे करून चालणार नाही. त्यांच्या विचारांशी आपल्याला बांधिलकी ठेवावीच लागेल, तसे झाले तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुळकर्णी यांनी केले.लोकमान्य टिळक, वीर सावरकर आणि ‘आजचा भारत’ या विषयावर रविवारी डोंगरी येथील सुधारगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांना डोंगरी येथील ज्या कोठडीत तुरुंगवास भोगावा लागला, त्या परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अभिनव केसरी मित्रमंडळ, मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या कारागृहातील सावकरांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, डोंगरीच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना, ते फिरण्यासाठी कारागृहाच्या आवारात यायचे, तेव्हा आजूबाजूच्या इमारतींतील माणसे गोळा होऊन त्यांना अभिवादन करायचे, परंतु ब्रिटिश त्यांना धमकवायचे.या कारागृहातील सश्रम कारावासात ते काथ्या कुटण्याचे काम करायचे. आपण जगतो ते पण काथ्याकूट करत जगतो. आयुष्य हे पण काथ्याकूट आहे. त्याचाच हा एक भाग आहे आणि म्हणून ते कर्तव्य म्हणून स्वीकारायला हवे, असे ते म्हणायचे.>समाजाला कर्तव्याचे भान द्यायचे केले कामडोंगरी कारागृहात लोकमान्य टिळक यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला होता. अंदमानातील शिक्षा त्यांनी आनंदाने भोगली. कारागृहात असताना त्यांनी महाकाव्य रचल्याचे स्वप्न पाहिले होते. लिहायला काही नव्हते, म्हणून त्यांनी कारागृहाच्या भिंतीवर खिळ्याने काव्य लिहिले. इच्छा असेल तर मार्ग मिळतो, ही शिकवण सावरकर यांनी दिली, असे ते म्हणाले.ते म्हणाले, टिळकांचा मृत्यू झाला, हे सावरकरांना तुरुंगात असताना कळले. त्यावेळी सगळे बंदी उपाशी राहिले होते. राजकारणावर बोलण्याची संधी नसतानाही, प्रतिकूल परिस्थितीतही सावरकरांनी कारावासात संघटना बनविल्या होत्या. लोकमान्य टिळक हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या, गणितज्ञ होते. समाजात एकरूपता, एकात्मता असेल, तेव्हाच राष्ट्र पुढे जाते. त्यासाठी लोकसंग्रह आवश्यक असतो.प्रत्येक माणूस बदलायला हवा, त्याने स्वतंत्रपणे विचार करायला हवा, असे लोकमान्य टिळक सांगत असत. लोकमान्य टिळकांनी मंडाले येथे ‘गीतारहस्य’ लिहिले. समाजाला कर्तव्याचे भान द्यायचे काम टिळक व सावरकर यांनी केले, असे त्यांनी नमूद केले.