मुंबई : पाकीट बंद पदार्थ विकत घेतल्यानंतर आपण त्या पाकिटावर त्याची उत्पादन तारीख व खाण्याची अंतिम तारीख तपासून घेतो; मात्र मिठाईच्या दुकानांमध्ये ठेवलेले मिठाई किंवा इतर पदार्थ घेताना आपण त्याची कोणतीही चौकशी करत नाही. मिठाईचे पदार्थ खुल्या स्वरूपात विकताना त्या पदार्थाची उत्पादन तारीख व वापरण्याच्या अंतिम तारखेचा उल्लेख असणे बंधनकारक आहे. एफएसएसआयने यासंदर्भात नियम जारी केला आहे.
श्रावण महिन्यात अनेक सण व उत्सव असल्याने घरोघरी मिठाई खाल्ली जाते. यामुळे दुकानांमध्ये मिठाईची मागणी वाढली आहे. अशावेळी गोड व दुग्धजन्य पदार्थ खाताना ते खाण्यास योग्य आहेत का हे तपासणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात गोड व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढते. असे भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यास त्याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
गोड खा पण काळजी घ्या
चेंबूर - चेंबूर येथील सिंधी कॅम्प, चेंबूर नाका, चेंबूर स्थानक व डायमंड गार्डन परिसरात गोड पदार्थांची अनेक दुकाने आहेत. येथे सणासुदीच्या काळात हजारोंच्या संख्येने नागरिक मिठाई खरेदी करतात.
दादर - दादर हे मुंबईकरांसाठी खरेदीच्या बाबतीत महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक मिठायांची दुकाने असल्याने नागरिक इतर खरेदी सोबतच मिठाई देखील खरेदी करतात.
घाटकोपर - घाटकोपर स्थानक परिसरातील विविध प्रकारच्या गोड पदार्थांची दुकाने असल्याने येथील नागरिकांची मिठाई खरेदीसाठी गर्दी झालेली असते.
अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर
सणासुदीच्या काळात गोड व दुग्धजन्य पदार्थांच्या होणाऱ्या भेसळीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे. परराज्यातून येणाऱ्या कच्च्या मालावर देखील अन्न व औषध प्रशासन विभाग नजर ठेवून आहे.
मास्कच्या बाबतीत तर आनंदी आनंद
अनेकदा मिठाईच्या दुकानांमध्ये दुकानांमधील कर्मचारी मास्क परिधान करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत ग्राहकांनी मालकाकडे तक्रार करणे गरजेचे आहे.
ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना ती ताजी आहे का याबाबत खात्री करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी शक्यतो उघड्यावरील मिठाई घेणे टाळावे, तसेच मिठाईच्या चवीमध्ये फरक आढळल्यास त्याबाबत संबंधित दुकानदाराला तक्रार करणे गरजेचे आहे.
स्टार १११०