Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने पैसे लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:01 IST

निलेश हा नवी मुंबईतील एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीला आहे. त्याचा पगार बँक आॅफ इंडियामध्ये जमा होतो.

ठाणे : बँक आॅफ इंडियाच्या मुंबईतील फोर्ट शाखेतून बोलत असल्याचे सांगून डेबिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून विटावा येथील निलेश पारटे (२२) या तरुणाच्या बँक खात्यातून एका भामट्याने ९९ हजार ९९० रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार ३ जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल आहे.

निलेश हा नवी मुंबईतील एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीला आहे. त्याचा पगार बँक आॅफ इंडियामध्ये जमा होतो. ३ जानेवारी रोजी तो घरी असतांना त्याला मोबाइलवर एक फोन आला. समोरील व्यक्तीने बँक आॅफ इंडियाच्या फोर्ट शाखेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड बंद पडले आहे, ते पुन्हा सुरु करण्यासाठी तुमचा कार्ड नंबर, मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक आणि लिंक द्या, असे सांगितले. फोनवरून बोलणाऱ्याने त्याचा विश्वास संपादन करून बँकेचे कार्ड क्र मांक आणि ओटीपी क्रमांक दिला. हे क्रमांक मिळताच त्यांच्या बँकेच्या खात्यातून ९९ हजार ९९० रुपये काढण्यात आल्याचा मेसेज त्यांना मोबाइलवरून मिळाला. बँकेत विचारपूस केल्यानंतर त्यांच्या खात्यातून आॅनलाइन हे पैसे काढल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

टॅग्स :ठाणे