Join us  

काळजी घ्या; मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 1:52 AM

एव्हाना दिल्लीसारख्या राजधानीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून, कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: युरोपियन देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परिस्थिती बिकट झाली असून, आता भारतातदेखील सातत्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. 

एव्हाना दिल्लीसारख्या राजधानीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून, कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या चित्रफितीच्या माध्यमातून दिल्लीतील कोरोना परिस्थिती विशद केली जात असून, आता याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी अधिकाधिक काळजी घेण्याची, सुरक्षितता घेण्याची विनंती केली जात आहे. कारण आता कुठे मुंबईने बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे. परिणामी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासह मुंबईची दिल्ली होऊ देऊ नये म्हणून मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतराचे नियम पाळा, असे आवाहन सातत्याने मुंबई महापालिकेकडून केले जात आहे.

दिल्लीमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष कोरोनाला बळी पडले आहेत. दिल्लीची परिस्थिती इटलीसारखी होत आहे. कोरोनाची मोठी लाट दिल्लीला धडकली आहे. रुग्णालयातील मृतांची आकडेवारी समोर येत आहे. मात्र ज्यांचे मृत्यू घरात होत आहेत, त्याबाबतची आकडेवारी समोर येत नाही. रुग्णालयात खाटा नाहीत. खाटा आहेत तर ऑक्सिजन नाही. 

ऑक्सिजन आहे तर व्हेंटिलेटर नाही अशी अवस्था आहे. मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी अडचणी येत आहेत. दिल्लीत वैद्यकीय आणीबाणी लागू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. गर्दी करू नका, बाहेर पडू नका, असे आवाहन येथील सेवाभावी संस्थांकडून केले जात आहे. दरम्यान, दिल्लीसारखी परिस्थिती मुंबईत होऊ नये. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून मुंबई महापालिका वेगाने काम करत आहे. 

विशेषत: मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल हे स्वत: मुंबईतील आरोग्य सेवांवर लक्ष ठेवून आहेत. दिवाळी आणि दिवाळीनंतर कोरोना वेगाने पसरू नये म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे चहल यांनी यापूर्वीच सांगितले आहे. भविष्यातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी नियम पाळा आणि कोरोनाला दूर ठेवा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

स्वच्छता राखाn आपण मुंबईत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.n नो मास्क, नो एंट्री ही मोहीम आपल्या सर्वांना वाचवू शकते.n मास्कचा उपयोग करा.n हातांची स्वच्छता राखा.n सुरक्षित अंतराचे पालन करा.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस