Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! आंबे घेताना तपासूनच घ्या - अन्न व औषध प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 03:14 IST

सध्या बाजारात हापूस आंब्यासह इतर प्रजातींच्या आंब्यांचे आगमन होऊ लागले आहे. परंतु बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते.

- सागर नेवरेकरमुंबई : सध्या बाजारात हापूस आंब्यासह इतर प्रजातींच्या आंब्यांचे आगमन होऊ लागले आहे. परंतु बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी, ग्राहकांनी जागरूक राहून आंबे खरेदी करावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.आंबे खरेदी करताना ओळखीच्या विक्रेत्यांकडून घ्यावेत. आंबे घेतल्यावर स्वच्छ पाण्याने धुवावेत. काही आंबे कॅल्शियम कार्बाईड पावडरने पिकविले जातात. त्यामुळे या आंब्यांवर काळे डाग पडतात. असे आंबे ग्राहकांनी घेऊ नयेत. हंगामाच्या आधी आंबे खरेदी करू नयेत. कारण ते कृत्रिमरीत्या पिकविलेले असू शकतात. आंबा हा पिळून न खाता कापून खावा; तसेच आंब्याची साल खाणे टाळावे. नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा हा पूर्णपणे पिवळ्या रंगाचा दिसतो. कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा हा पिवळा जरी दिसत असला, तरी देठाकडे हिरवा रंगाचा असतो.अन्न व औषध सुरक्षा प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यासंदर्भात म्हणाल्या की, आता आंब्याचा हंगाम सुरू झालेला आहे. ग्राहकांनी चांगल्या दर्जाचा आंबा खरेदी करावा. तसेच ओळखीच्या विक्रेत्यांकडून खरेदी करावा. ग्राहकांनी आंबा खरेदी करताना देठाकडील भागाकडे लक्ष द्यावे. देठाकडील भाग हिरव्या रंगाचा आढळल्यास तो कृत्रिमरीत्या पिकविलेला असतो. कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा आढळून आल्यास त्वरित अन्न व औषध सुरक्षा प्रशासना (एफडीए)ला त्याची माहिती द्यावी. संबंधित आंबे विक्रेत्यावर एफडीए कारवाई करेल. अन्न सुरक्षा कायद्यानुसार रासायनिक पदार्थ (कॅल्शियम कार्बाईड)ने आंबा पिकविण्यावर मनाई आहे. परंतु २०१६ पासून इथिलिन गॅस (इथेफॉन पावडर) मार्फत आंबा पिकविण्यास मान्यता देण्यात आली आहे.ग्राहकांनी आंबा खरेदी करताना देठाकडील भागाकडे लक्ष द्यावे. देठाकडील भाग हिरव्या रंगाचा आढळल्यास तो कृत्रिमरीत्या पिकविलेला असतो. कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा आढळून आल्यास त्वरित एफडीएला त्याची माहिती द्यावी.

टॅग्स :आंबामुंबई