Join us

कुंबळेवर बीसीसीआय नाराज? प्रशिक्षक पदावर टांगती तलवार!

By admin | Updated: May 25, 2017 15:13 IST

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या पदावर टांगती तलवार आहे. त्याच्याशी झालेल्या करारास थेट मुदतवाद

 ऑनलाइन लोकमत

 मुंबई, दि. 25 -  भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या पदावर टांगती तलवार आहे. त्याच्याशी झालेल्या करारास थेट मुदतवाद देण्याचे बीसीसीआयने टाळले आहे. तसेच प्रशिक्षक पदासाठी नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, सध्याचा प्रशिक्षक म्हणून निवड प्रक्रियेत त्याला थेट प्रवेश देण्यात आला आहे. 
 
आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीसीसीआय भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी निविदा मागवत आहे. प्रशिक्षक पदासाठीची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहणार असून, अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून सर्वोत्तम उमेदवाराची निवड  बीसीसीआयची  प्रशासकीय समिती सल्लागार समितीच्या मदतीने करणार आहे. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश आहे. 
 
पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बीसीसीआयचा कुंबळेसोबत झालेला करार संपुष्टात येणार आहे. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त झाली आहे.  मात्र असे असले तरी त्याच्याशी असलेल्या करारास थेट मुदतवाद देण्यास बीसीसीआय उत्सुक नसल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अनिल कुंबळेने स्वत:च्या आणि मध्यवर्ती करार असलेल्या खेळाडूंच्या मानधनात मोठी वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बीसीसीआय कुंबळेवर नाराज आहे.  
 
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अनिल कुंबळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या स्पर्धेतील गतविजेता असलेला भारतीय संघ विजेतेपद राखेल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट प्रेमींना आहे.