Join us  

श्रेयवादाची लढाई : हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा दुसºयांदा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:11 AM

२ वर्षांच्या विलंबानंतर हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली, पण वाद काही अद्याप मिटलेला नाही. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे.

मुंबई : २ वर्षांच्या विलंबानंतर हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली, पण वाद काही अद्याप मिटलेला नाही. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. महापौरांच्या हस्ते सोमवारी या बांधकामाचा आरंभ झाल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविकांनी मंगळवारी पुन्हा शुभारंभाचा कार्यक्रम उरकला. त्यामुळे हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.डोंगरी नूरबाग येथून हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला सोमवारी सुरुवात करण्यात आली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. अशा कार्यक्रमांमध्ये स्थानिक नगरसेवक अध्यक्षस्थानी असतात. मात्र, कार्यक्रमासंदर्भात विश्वासात न घेताच, कार्यक्रमाच्या १२ तास आधी निमंत्रणपत्रिका पाठविल्याची नाराजी या नगरसेविकांनी व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका सोनम जामसूतकर, निकिता निकम यांचे नाव कार्यक्रमावर अध्यक्षस्थानी टाकण्यात आले. मात्र, दोघींनीही कार्यक्रमास गैरहजर राहत निषेध नोंदविला. या कार्यक्रमात भाषण करतानाही या पुलाच्या पुनर्बांधणीचे सर्व श्रेय सत्ताधारी शिवसेनेने लाटले.सभागृह नेते व स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव यांनी पालिकेच्या विविध अधिका-यांशी संपर्क साधून पुलासाठी पाठपुरावा केला, असे जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामुळे संतप्त काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविकांनी मंगळवारी या कामाचा पुन्हा शुभारंभ केला. त्यामुळे श्रेयवादाच्या या लढाईत सेना-काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईशिवसेनानॅशनल काँग्रेस पार्टी