तानाजी घोरपडे -हुपरी -चांदीच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. शे-पाचशे रुपयांची घसरण व ५० ते १०० रुपयांची वाढ असा असमतोलपणा प्रत्येक दिवसागणिक पहावयास मिळत आहे. परिणामी रौप्यनगरीतील संपूर्ण चांदी उद्योगामध्ये मंदीचे वातारवण पसरले जावून दागिने बनविणाऱ्या धडी माल उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवसायासाठी बॅँकाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्तेही भरणे अशक्य होऊन गेल्याने बॅँकाच्या वसुलीच्या तगाद्यामुळे धडी माल हैराण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.दरम्यान, चांदीचे दागिने तयार करताना मिळणाऱ्या प्रतिकिलोच्या मजुरीवर व वेस्टेजमध्ये उत्पादन खर्चही भागत नसल्याने काही धडीवाल्या व्यावसायिकांनी आपले काम तात्पुरते थांबविले आहे. तर काहींनी आर्थिक तोटा व मनस्ताप सहन करीत व्यवहार ठेवले आहेत. चांदीच्या दरामध्ये सुरु असणारी घसरण धडीवाल्यांची कंबरडे मोडणारी ठरत आहे. त्यामध्ये भर म्हणून की काय धडीवाल्यांना दागिने तयार करण्यासाठी द्यावी लागणारी चांदी कमी दर्जाची देणे, साडेपाच टक्के वेस्टेज न देणे, भेसळयुक्त पाटली (विटा) देणे असे वारंवार प्रकार उघडकीस येत आहेत. या सर्व घटनाक्रमामुळे रौप्यनगरीच्या चांदी उद्योगाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या धडीवाल्यांची मोठ्या प्रमाणात फरफट होण्याबरोबरच आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे धडी उत्पादक सध्या विविध प्रकारच्या गंभीर समस्याने ग्रासले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये जागतिक बाजारातील विविध घटना व घडामोडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबरोबरच वायदेबाजारामध्ये (एम.सी.एक्स.) सोन्या-चांदीचा व्यवहार काही अंशी केंद्र शासनाने निर्बंध घातल्याने त्याचा सोने- चांदीच्या दरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ५५ ते ६० हजारांच्या घरात खेळणारा चांदीचा दर गेल्या काही दिवसांपासून ४१ हजारांच्या खाली आला आहे. दरातील ही घसरण चांदीचे दागिने तयार करणाऱ्या धडीवाल्यांना अडचणीची ठरत आहे. दागिने तयार करण्यासाठी मिळणाऱ्या अत्यल्प मजुरीमध्ये तर उत्पादन खर्च भागतच नाही. त्यामुळे पर्यायाने ‘वेस्टेज’ म्हणून मिळणारी चांदी विकून उत्पादन खर्च भागवावा लागत आहे. सध्या चांदीच्या दरातील घसरणीमुळे वेस्टेजमधील चांदी विकली तरीसुद्धा उत्पादन खर्च भागत नाही. परिणामी पदरमोड करुन दागिने तयार करण्याचे काम धडीवाल्यांना करावे लागत आहे. उद्योजकांतून चिंताऔद्योगिक क्षेत्रामध्ये तयार झालेले मंदीचे वातावरण, नाणी उत्पादकांकडून चांदीच्या मागणीचा ओसरलेला जोर, जागतिक मंदीच्या वातावरणाचा परिणाम म्हणून सट्टेबाजांनी थांबविलेली खरेदी-विक्री, केंद्र शासनाने वायदेबाजारातील व्यवहारावरील निर्बंध यामुळे होणारे बेकायदेशीर व्यवहार आदींचा परिणाम निश्चितपणाने चांदीच्या दरावर झाल्याचे मत जाणकार उद्योजकांतून व्यक्त केले जात आहे.
चांदी दरातील घसरण धडीवाल्यांच्या मुळावर
By admin | Updated: September 25, 2014 00:31 IST