Join us  

मुंबईतील मूलभूत सुविधा, योजनासाठी सदैव दक्ष; मुख्यमंत्र्यांचा वरळीतून प्रतिसादात्मक जनसंवाद

By मनोहर कुंभेजकर | Published: March 07, 2024 6:51 PM

कोस्टल रोड जवळ जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क

मनोहर कुंभेजकर, मुंबई: मुंबईकरांच्या रस्ते, आरोग्य, पाणी आदी मूलभूत सुविधांसाठी आपण सदैव दक्ष असून मुंबईच्या विकास योजनां पूर्णत्वास नेण्यावरही आपले लक्ष असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी आज वरळीत मुंबईकरांशी प्रतिसादात्मक जनसंवाद साधत त्यांना आश्वस्त केले. वरळी विधानसभा क्षेत्राला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील वाहतूकीच्या दृष्टीने गेम्स जेंजर ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचे ९५% काम पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची पाहणी करीत आढावा घेतला. या पाहणीनंतर त्यांनी वरळी विभागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला अचानक भेट दिली. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दवाखान्यातील साठवणूक कक्ष, औषध कक्ष, रुग्ण तपासणी कक्ष, स्वच्छतागृह आदी गोष्टींची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य तपासणीसाठी आलेल्या रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमवेत वरळी विधानसभा मतदार क्षेत्रात वरळीकरांशी दिलखुलास संवाद साधत इथला परिसर अक्षरशः पिंजून काढला. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू व डॉ. सुधाकर शिंदे यावेळी उपस्थित होते. 

कोस्टल रोड जवळ जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क

बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचे ९५% काम पूर्ण झाले असून इतर कामे वेगाने पूर्णत्वास येतील. त्यामुळे मुंबईकरांना कोस्टल रोड वरून प्रवास करता येईल. त्यामुळे कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर करण्याचे सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच कोस्टल रोड हा फक्तं रस्ता नसून त्यालगत ३२० एकरचे जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क देखील बनवण्यात येणार आहे. त्याचेही काम वेगाने सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिलपासून

 मुंबईतील जनतेला घराजवळ आरोग्य सुविधा मिळावी या संकल्पनेतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सुरु केली. आत्तापर्यंत मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले असून सुमारे ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस, पेपरलेस मिळत आहेत. मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच येत्या एप्रिल महिन्यापासून झीरो प्रिस्किपशन पॉलिसी सुरू असून त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदे