कल्याण : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सद्य:स्थितीला २५ टक्के इतकाच पाणीसाठा असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळाने केले आहे. धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रगतीपथावर असून हे काम पूर्ण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात ४० टक्के पाणीसाठा अधिक वाढेल, असा दावा करण्यात येत आहे.डोंबिवली पत्रकार संघाच्या सदस्यांनी बुधवारी बारवी धरणाला भेट दिली. या वेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. मान्सून सक्रिय होण्यासाठी अजून बराच काळ असल्याने पाणीकपातीचे संकट अधिक गडद होणार आहे. धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असून हे काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. धरणाचे ११ स्वयंचलित दरवाजे बसविण्याचे कामही प्रगतीपथावर असून मे महिनाअखेरपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात धरणात ५७.८७ दशलक्ष घनमीटर (३३ टक्के) पाणीसाठा होता. ७ टक्के साठा कमी आहेसध्या १५ टक्के पाणीकपात लागू आहे. पाण्याची घटलेली पातळी पाहता कपातीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उन्हाचे प्रमाण वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवनदेखील झपाट्याने होत आहे. त्यामुळे धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असला तरी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महामंडळाचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी केले आहे.
बारवी धरणाने तळ गाठला
By admin | Updated: May 7, 2015 03:04 IST