Join us  

मार्चअखेर बँकांचा एनपीए १२.५ टक्क्यांवर जाणार?;आर्थिक स्थिरता अहवालाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:33 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेचा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, त्यावेळी दास बोलत होते.

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. असे असले तरी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशातील बँकांकडील अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) वाढून १२.५ टक्के होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. मार्च २०२० अखेरीस बँकांच्या अनुत्पादक मालमत्ता ८.५ टक्क्यावर होत्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, त्यावेळी दास बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव असल्याने मार्च २०२१ पर्यंत बँकांची एकूण अनुत्पादक मालमत्ता १४.७ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल, अशी भीतीही दास यांनी व्यक्त केली.देशातील सर्व अनुसूचित व्यापारी बँकांकडील अनुत्पादक मालमत्ता मार्च २०२० मध्ये ८.५ टक्के होती.

गेले काही महिने सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला आहे. त्यामुळेच या बॅँकांकडील अनुत्पादक मालमत्ता वाढून १२.५ टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती या अहवालात व्यक्त केली गेली आहे. स्थिती आणखी गंभीर झाल्यास अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण १४.७ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे दास यांनी सांगितले.

बँकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्याबाबत माहिती घेऊन या अहवालात त्यांच्यामुळे बँकांच्या नफा कमाविण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास केला गेला आहे. होणाऱ्या परिणामानुसार बँकांची मध्यम, गंभीर आणि अतिगंभीर अशा ३ संवर्गात विभागणी करण्यात येणार आहे. देशाची अर्थव्यवस्था त्याचप्रमाणे भांडवल व चलनबाजार यामध्ये सध्या मोठी अस्थिरता आलेली आहे. लवकरच स्थिती सामान्य होऊन देशाची अर्थव्यवस्था प्रगतिपथावर वाटचाल करू लागेल, असा विश्वासही दास यांनी यावेळी व्यक्त केला.

भांडवल वाढविण्याकडे लक्ष द्यावे

च्देशातील बँका आणि वित्तीय संस्था यांच्यासाठी सध्या काहीसा खराब कालखंड असला तरी या संस्थांनी आपले असलेले भांडवल सुरक्षित राखून त्यामध्ये वाढ कशी होईल हे बघणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी ही बाब प्राथमिकता असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले. देशातील विविध कंपन्या, गुंतवणूकदार आणि नागरिक यांचा अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेवर असलेला विश्वास दूर होण्यासाठी आर्थिक क्षेत्राची स्थिरता सर्वात महत्त्वाची आहे.

आर्थिक वृद्धिदरामध्ये घट होण्याचा कालखंड

कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांना फटका बसला असून, परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. या साथीमुळे चालू आर्थिक वर्षात जवळपास सर्वच अर्थव्यवस्थांच्या वृद्धिदरामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. या साथीमुळे जगभरातील वस्तू आणि सेवांची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. ही साखळी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी काय करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणे जरुरीचे आहे. या साथीच्या कालावधीतच देशातील भांडवल बाजारात आलेल्या तेजीबद्दल दास म्हणाले की, सध्या आर्थिक क्षेत्रातील काही घटकांमध्ये ताळमेळ दिसत नाही. त्याच काळात आलेला हा अहवाल महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकभारत