Join us

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी दोन दिवस संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी राज्यातील पन्नास हजारांहून अधिक बँक कर्मचारी तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी राज्यातील पन्नास हजारांहून अधिक बँक कर्मचारी तसेच अधिकारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी येत्या १५ आणि १६ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तत्पूर्वी १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवारी आणि नंतर सोमवार, मंगळवार संपामुळे सलग चार दिवस सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात आले तर त्यातून मूठभर मोठ्या उद्योगांचा फायदा होईल. मात्र सामान्य माणूस बँकिंगच्या वर्तुळाबाहेर फेकला जाईल. या खासगी बँका फक्त आणि फक्त नफ्यासाठी काम करतात. यामुळे शेती, रोजगार निर्मिती, छोटा उद्योग, व्यवसाय यांना दुर्लक्षिले जाईल. खेड्यातले आणि मागास भागातले बँकिंग आकुंचित होईल.

संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ बँक ऑफिसर्स, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यात या संघटनांचे दहा हजारांहून अधिक बँक शाखांतून काम करणारे ५० हजारांपेक्षा जास्त बँक कर्मचारी तसेच अधिकारी १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

....................