Join us  

ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्या ‘जेट’ला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:10 AM

भरपाईपोटी ९० हजार देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश; व्हिसाबाबत शंका आल्यास लेखी तक्रार देण्याचे निर्देश

- दीप्ती देशमुख मुंबई : विमानाचे तिकीट कन्फर्म असतानाही ऐनवेळी प्रवाशाला बोर्डिंग पास नाकारणाऱ्या जेट एअरवेजला ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका देत नुकसानभरपाईपोटी ९० हजार २०० रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. एअरलाइन्स कंपनी आपल्या नफ्याकरिता एखाद्या प्रवाशाला ऐनवेळी डी बोर्ड करून आयत्या वेळी आलेल्या प्रवाशांकडून भरमसाट पैसे घेऊन त्याला आसन देत असल्याच्या तक्रारीही ग्राहक मंचासाठी नव्या नाहीत, असा टोलाही मंचाने जेट एअरवेजला लगावला.गोरेगावच्या डॉ. सायली धुमक यांनी जानेवारी २००९ मध्ये त्यांच्या अमेरिकास्थित बहिणीला भेटण्यासाठी लंडनमार्गे जाण्याकरिता जेट एअरवेजचे तिकीट बुक केले. प्रवासाच्या दिवशी त्या चार तास आधी सहार विमानतळावर पोहोचल्या. चेकइनसाठी जेट एअरवेजच्या काउंटरवर गेल्या असता, तेथील कर्मचाºयाने त्यांचा व्हिसा योग्य नसल्याचे सांगत बोर्डिंग पास न देता ताटकळत ठेवले. शिवाय त्यांच्या अमेरिकेतील बहिणीलाही फोन करून घाबरवले.अखेरीस सायली व त्यांच्या कुटुंबीयांनी दुसºयाच दिवशी यू.एस. दूतावासात जाऊन व्हिसाबाबत चौकशी केली. त्यावर अमेरिकेच्या दूतावासाने त्यांचा व्हिसा योग्य असून, जेट एअरवेजच्या कोणत्याही कर्मचाºयाने याबाबत आपल्याकडे चौकशी केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा सायली यांनी जेट एअरवेजशी संपर्क साधला आणि लंडनला जाणाºया विमानाबाबत चौकशी केली. मात्र, जेटच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तिकिटाचे पैसे परत करण्यासही नकार दिला. त्यामुळे सायली यांनी ग्राहक तक्रार मंचात धाव घेतली.तक्रारदाराच्या वतीने त्यांचे वडील अनिल धुमक यांनी ग्राहक मंचापुढे युक्तिवाद केला. जर व्हिसा अयोग्य होता तर संबंधित कर्मचाºयाने अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधला नाही किंवा इमिग्रेशन विभागाकडेही याबाबत तक्रारही केली नाही. पोलिसांनाही माहितीदिली नाही. केवळ त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन तासन्तास ताटकळत ठेवले, असे धुमक यांनी मंचाला सांगितले.जेट एअरवेजने हे सर्व आरोप फेटाळले. तक्रारदाराचा व्हिसा योग्य नव्हता. अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही. तसेच दुसºया दिवशी लंडनला जाणाºया पहिल्या विमानातून प्रवास करण्याची मुभा दिल्याचे जेटने ग्राहक मंचाला सांगितले.आरक्षित आसनावरून प्रवास केला कुणी?ग्राहक मंचाचे अध्यक्ष एम. वाय. मानकर व सदस्य ए. एच. खान यांनी जेटचा युक्तिवाद फेटाळला. ‘तक्रारदाराला ऐनवेळी त्यांच्या कन्फर्म तिकिटावरून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे आरक्षित रिक्त आसनावरून दुसºया कोणी प्रवास केला, हा प्रश्न उपस्थित होतो. कंपनीने याबाबत काहीही स्पष्टीकरण दिले नाही. एअरलाइन्स आपल्या नफ्याकरिता एखाद्या प्रवाशाला ऐनवेळी डी बोर्ड करून आयत्या वेळी आलेल्या प्रवाशाकडून भरमसाट पैसे घेऊन त्याला आसन देण्याच्या तक्रारी मंचामध्ये काही नवीन नाहीत, असे निरीक्षण मंचाने नोंदविले.तोंडी माहिती का दिली?त्याशिवाय मंचाने पुढे म्हटले की, जेटला जर व्हिसाबाबत शंका होती तर त्यांनी ही बाब लेखी स्वरूपात देणे जास्त योग्य झाले असते. तक्रारदारांना तोंडी माहितीच्या आधारे येथून तिथे व तिथून येथे टोलविण्यात आले. दरम्यान, ग्राहक मंचाने सायली यांना झालेल्या खर्चापोटी ३०,२०० रुपये, मानसिक त्रासाकरिता ५०,००० रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून १०,००० रुपये देण्याचे निर्देश जेटला दिले.

टॅग्स :जेट एअरवेज