Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बंगाबंधू’मुळे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:08 IST

अमित देशमुख : बांगलादेशच्या मंत्र्यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बांगलादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान ...

अमित देशमुख : बांगलादेशच्या मंत्र्यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बांगलादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जीवनावर आधारित ‘बंगाबंधू’ या सिनेमाचे चित्रीकरण सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरू आहे. या सिनेमाच्या निर्मितीमुळे महाराष्ट्र आणि बांगलादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

बांगलादेशचे माहिती मंत्री डॉ. हसन महमूद यांनी सोमवारी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह बांगलादेशचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळात बांगलादेशचे खासदार शाल्मुम सरवर कमाल, बांगलादेशचे भारतातील उप उच्चायुक्त मु. लुत्फर उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. के. व्यास, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह दादासाहेब फाळके चित्रनगरीचे अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, या सिनेमामध्ये बांगलादेशचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यनंतरचा इतिहास दाखविला जाणार असून, या सिनेमाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल करीत आहेत. विशेष म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यमाने हा सिनेमा बनविला जात आहे. या सिनेमाचे चित्रीकरण कोलकाता आणि मुंबई येथे होत आहे.

भारत आणि बांगलादेश यांची नैसर्गिक मैत्री असून, दोन्ही देशांना ऐतिहासिक वारसा आहे. दोन्ही देशांत उद्योग, सांस्कृतिक आणि वाणिज्यिक चांगले संबंध आहेत. ‘बंगाबंधू’ सिनेमामुळे बांगलादेशची महाराष्ट्राबरोबरची घनिष्ठता वाढेल, असा विश्वास डॉ. हसन महूमूद यांनी व्यक्त केला.

चित्रीकरणास एक खिडकीद्वारे परवानगी

या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या चित्रनगरी येथे कार्यरत असलेल्या एक खिडकी प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आनंदही महमूद यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र भेटीवर आलेल्या बांगलादेश शिष्टमंडळाने यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि या सिनेमाच्या कलाकारांसमवेत संवाद साधला. याशिवाय चित्रनगरी येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत मेकअप रूम संकुलाचा प्रारंभ केला तसेच चित्रनगरी येथील मंदिर आणि काही चित्रीकरण स्थळे पाहिली.