पालघर : कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ते अद्यापही दूर होऊ शकले नाही. अनेकवेळा ग्रामीण भागात गरजुपर्यंत योजनेची माहितीही दिली जात नाही. तर, दुसरीकडे सकस आहाराची शेकडो पाकीटे समुद्र किनाऱ्यावर फेकून दिल्याचे उजेडात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित यंत्रणेची भंबेरी उडाली आहे. बुधवारी पंचायत समितीचे सभापती रवींद्र पागधरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले.महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभाग, आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर केलेल्या दरानुसार प्रत्येक तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत घरपोच आहाराचे वाटप करण्यात येते. जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी ग्रामीण व अतिदुर्गम भागातील कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी ६ महिने ते ३ वर्षांची बालके, ३ वर्ष ते ६ वर्षांची सर्वसाधारण व कमी वजनाची बालके, स्तनदा माता व गरोदर महिला, किशोरवयीन मुली आदींना सकस आहाराचा पुरवठा करण्यात येतो. असे असले तरी, पालघर तालुक्यातील सातपाटी-शिरगाव समुद्र किनाऱ्यावर सकस आहाराची शेकडो पाकीटे फेकून देण्याचा गंभीर प्रकार लोकमतने उजेडात आणाला. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती रवींद्र पागधरे, सदस्य मेघन पाटील, सुरेश पाटील यांच्यासह पालघर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एन. डी. वालेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी त्यांना शेकडोच्या संख्येने सकस आहाराची पाकीटे टाकण्यात आल्याचे दिसून आले. याचे पंचनामे करण्यात येणार असून अंगणवाडी सेवीकेनी स्वीकारलेला कोटा व वाटप केलेला कोटा तपासून पाहण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे प्रकल्पाधिकारी वालेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
आहारप्रकरणी यंत्रणेची उडाली भंबेरी
By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST